Kolhapur News : कोल्हापूर शहरामध्ये शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील वाद आणखी पेटला आहे. शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. 


गुन्हा दाखल झाल्याने एकनाथ शिंदे गटाचे समर्थक माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मी त्या ठिकाणी असतो, तर ठोकून काढलं असतं, अशी प्रतिक्रिया दिली आहे. महिला व्यासपीठावर असताना अश्लील हावभाव करणे हे ज्यानं कोणी केलं असेल त्याला शोभत नाही. महिला आघाडी सदस्यांनी ही तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी पाहणी करूनच गुन्हा दाखल केला असेल. गुन्हा खोटा नसून यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नसल्याचा दावाही त्यांनी केला. 


पेड कार्यकर्त्यांकडून घृणास्पद कृत्य झालं असून त्या ठिकाणी फिरंगाई तालमीचा एकही कार्यकर्ता त्या ठिकाणी नव्हता, असेही राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे. मी जास्त महत्व देत नाही, पण अशी कामं कोणी करू नयेत. कायद्याने कारवाई होईल, असेही क्षीरसागर म्हणाले. 


रविकिरण इंगवले यांच्यासह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा


कोल्हापूरमध्ये शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीतील प्रकारावरून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या शहर संघटकांकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये राजेश क्षीरसागर गटाच्या बूथ समोर मिरवणूक आल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली होती. 


गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पापाची तिकटी परिसरात मंडळाच्या स्वागतासाठी अनेक मंडप उभारण्यात आले होते. यावेळी एकनाथ शिंदे गटाच्या राजेश क्षीरसागर यांच्याकडूनही पान सुपारी मंडप उभारण्यात आला होता. या मंडपासमोर शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले अध्यक्ष असलेल्या फिरंगाई तालीम मंडळाची मिरवणूक आल्यानंतर जोरदार  घोषणाबाजी करण्यात आली होती. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या.  


यावेळी मंडपाच्या व्यासपीठावरील महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन, हातवारे आणि शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काल उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाला असला, तरी कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या