Raju Shetti: शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 11जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत, या पार्श्वभूमीवर ऊस दर नियंत्रण समितीच्या स्थापनेसह शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानावर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला नसल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी जनता दरबारातच मुख्यमंत्र्यांना जाब विचारतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. या संदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात 11 जून रोजी येत आहेत. आमच्या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात हजार शेतकऱ्यांच्या साक्षीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही जाब विचारू. शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केलं आहे या संदर्भात शासनाने तातडीने खुलासा करावा अशी मागणी करताना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी प्रश्न मिटला नसल्यास स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करू असा इशाराही शेट्टी यांनी दिला. 


प्रोत्साहान अनुदान अजूनही नाही  


राजू शेट्टी यांनी सांगितले की, राज्य सरकारने गेल्या 14 महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम अद्याप दिलेली नाही. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी मागणी केली आहे. तातडीने प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणेसंदर्भात आदेश व्हावेत, ही देखील आमची आग्रही मागणी आहे. राजू शेट्टी म्हणाले की, राज्य सरकारने ऊस दर नियंत्रण समिती न नेमल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारला आम्ही गेल्या वर्षभरापासून या संदर्भात वेळोवेळी ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करण्यासाठी मागणी केली आहे. ऊस दर समिती स्थापन न झाल्यामुळे राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी गेल्या दोन हंगामातील अद्याप उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिलेला नाही. शेतकऱ्यांचे हजारो कोटी रूपये साखर कारखानदार बिनव्याजी वापरत आहेत.


दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 11 जून कोल्हापूर दौऱ्यावर येत असून तपोवन मैदानावर भव्य सभा होणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे एक लाख नागरिक सहभागी होतील. यावेळी शासकीय योजनांच्या पन्नास हजार लाभार्थ्यांना पत्राचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. यापूर्वी, 28 मे रोजी मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा नियोजित केला होता. मात्र, संसद भवनाच्या उद्घाटनामुळे तो रद्द करावा लागला होता. यानंतर 5 जूनला मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली होती. मात्र, आता 11 जूनला मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा निश्चित करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या