कोल्हापूर : राज्यातील सर्वाधिक चर्चेची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळ ठोकलेली लढत म्हणून कोल्हापूर आणि हाकणंगलेकडे पाहिलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर आणि हातकणंगलेत तळ ठोकल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोल्हापूरमध्ये दुरंगी लढत थेट होत असली, तरी हातकणंगले चौरंगी लढत होत असल्याने आणखी उत्सुकता वाढली आहे. हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी रिंगणात आहेत. त्यांनीही गेल्या अनेक महिन्यांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढला आहे. निवडणूक लागल्यापासून त्यांचा ताकदीने प्रचार सुरु आहे.  


राजू शेट्टी यांच्या प्रचारात महिला शेतकरी सुद्धा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. स्वाभिमानीच्या महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. इचलकरंजीमधील हा व्हिडिओ असून प्रचारासाठी फिरत असलेल्या महिलांना या कामासाठी पगार मिळतो का असे विचारताच त्यांनी दिलेल्या उत्तराने पगारी कार्यकर्त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. 


शेतकऱ्यांचे कुंकू वाचववण्याचे काम राजू शेट्टी यांनी केलं


महिला कार्यकर्त्या घरोघरी जाऊन प्रचार पत्रके वाटत असतानाच एक ज्येष्ठ महिला त्यांना उद्देशून तुम्हाला पगार वगैरे सुरु आहे की नाही? अशी विचाणा करते. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी उत्तर देताना सांगितले की, आम्हाला पगार वगैरे काही मिळत नाही. सकाळी सातला आल्यानंतर संध्याकाळपर्यंत 10 पर्यंत आम्ही स्वच्छेने काम करत आहोत, त्यामुळे स्वत:हून काम करत आहोत. राजू शेट्टी शेतकऱ्यांचा मुलगा असून शेतकऱ्यांच्या मुलगा संसदेत जाण्यासाठी आम्ही बहिणीसारखं पाठबळ देत आहे. स्वत:च्या खर्चाने आम्ही महिनाभरापासून फिरत आहोत. आम्ही स्वाभिमानी महिला आहोत. आम्ही आमचा डबा घेऊन येतो. शेतकऱ्यांचे कुंकू वाचववण्याचे काम राजू शेट्टी यांनी केलं आहे. साहेबांच्या उपकाराचं देणं लागतो म्हणून आम्ही करत आहोत. आमच्यासाठी ते पाच वर्ष काम करत आहेत, आम्ही एक महिन्यापासून काम करत आहोत. हे आमचं कर्तव्य आहे. 


धनशक्ती विरुध्द जनशक्तीची ही लढाई 


दरम्यान, प्रहारचे बच्चू कडू यांनी जयंत पाटलांच्या बालेकिल्ला असलेल्या इस्लामपुरात यांनी राजू शेट्टींच्या प्रचारार्थ सभा घेतली. ते म्हणाले की, कोण म्हणतो हिंदू संकटात, तर कोण म्हणतो मुस्लिम संकटात, पण मी म्हणतो हिंदू वा मुस्लिम संकटात नाही, तर शेतकरी, कष्टकरी, मजूर संकटात आहे. जात व धर्म एकत्र आणल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना निवडून येऊ शकत नाहीत. मी नेता म्हणून नव्हे, तर शेतकऱ्यांचा कार्यकर्ता म्हणून राजू शेट्टी यांच्या प्रचाराला आल्याचे प्रतिपादन बच्चू कडू यांनी केले. हक्क हवा असल्यास व्यवस्थेविरोधात लढायला शिका. निवडणुका आल्यावर जातीचं राजकारण पेरलं जातं. शेतकऱ्यांसाठी लढणारे कोणी नाहीत, आमच्यावर शेतकऱ्यांचा दबाव राहील, म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणाऱ्या शेट्टींना लोकसभेत पाठवा, असेही आवाहन त्यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या