Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) करवीर तालुक्यातील उचगाव कृषी महाविद्यालयाच्या शेतवडीत कामगाराचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली. आज (20 एप्रिल) सकाळी ही घटना माॅर्निंग  वाॅकला गेलेल्यांना मृतदेह दिसून आल्यानंतर पोलिस पाटलांना माहिती दिल्याने समोर आली. गणेश नामदेव संकपाळ (वय 47, रा. गणेश काॅलनी, उचगाव) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, हा खून कोणत्या कारणातून झाला? याबाबत माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरु केला आहे. गांधीनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.   


मयत गणेश हा एका फर्निचरच्या दुकानात कामाला होता. कृषी महाविद्यालयाच्या परिसरात खून झाल्याचे समजताच यावेळी मोठी गर्दी झाली. पोलिस पाटलांनी घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. करवीर उपविभागीय पोलिस अधीक्षक संकेत गोसावी, गुन्हे अन्वेषण विभाग, गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले यानी भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. हा परिसर निर्जन असल्याने अनेकजण उघड्यावर मद्यप्राशनासाठी येत असतात. त्यामुळे पोलिसांनी शक्यता गृहित तपास सुरु केला आहे. 


सात दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला


दरम्यान, करवीर तालुक्यातील (Kolhapur Crime) कसबा आरळेमध्ये तुळशी नदीच्या पात्रात बुधवारी (19 एप्रिल) सात दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. गणेश संजय शिंदे (वय 27 ) असे त्याचे नाव असून तो सात दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. या घटनेची नोंद करवीर पोलिसांकडे झाली आहे. शेतात काम करत असताना शेतकऱ्यांना नदीपात्रात झुडपात अडकलेला मृतदेह दिसून आला. यानंतर या घटनेची माहिती माहिती पोलिस पाटील यांना देण्यात आली. पोलीस पाटील उत्तम कांबळे यांनी करवीर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सामाजिक तरुणांच्या मदतीने सडलेला मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवणे अशक्य होते. तथापि, गणेश शिंदे हा मतिमंद युवक 13 एप्रिल रोजी घरातून गायब झाल्यानंतर करवीर पोलिसात तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी ओळख पटवून सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. त्याच्या पश्चात आई, विवाहित भाऊ असा परिवार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या