Rajaram Sakhar Karkhana : अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या सुरुवातीलाच विरोधी गटाचे उमेदवार अवैध झाल्याने रणकंदन माजले आहे. विरोधी सतेज पाटील गटाकडून या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. दरम्यान, सतेज पाटील गटाच्या 29 उमेदवारांच्या अवैध ठरवण्यावर सुनावणी पूर्ण झाली आहे. उद्या गुरुवारी (6 मार्च) सत्तारूढ महाडिक गटाकडून त्यांचं म्हणणं सादर केले जाणार आहे. त्यामुळे सोमवारी 10 एप्रिलपर्यंत अवैध ठरलेले उमेदवारी पुन्हा वैध ठरणार की, अवैधच कायम राहणार या संदर्भातील निकाल जाहीर केला जाणार आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. 


कारखान्याने सभासदांना आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वेगवेगळे दाखले दिले, उसाची बिले जमा झाली मग ऊस गेला नाही कसे म्हणता? राजाराम कारखाना प्रशासनाने दालमिया कारखान्याला ऊस घातल्याचे खोटे पत्र जोडले, बोगस सह्या करून हरकती घेतल्या, असा दावा विरोधकांकडून करण्यात आला आहे.


दरम्यान, सुनावणीसाठी पाटील आणि महाडिक गटाच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, सुनावणीवेळी दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले.  सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सत्तारूढ गटाने म्हणणे मांडावे, अशी मागणी विरोधी गटाकडून करण्यात आली होती.  यावेळी सातारमध्ये आज सुनावणी होणार असल्याने उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे म्हणणे मांडण्यासाठी गुरुवारी सुनावणी घ्यावी, अशी मागणी सत्ताधारी गटाचे वकील लुईस शहा यांनी केली. यावर विरोधी गटाचे वकील अॅड. प्रताप इंगळे यांनी आक्षेप घेतला. वयोवृद्ध उमेदवारांचा मुद्दा उपस्थित करत त्यांना येण्या जाण्यासाठी त्रास होत असल्याचे सांगितले. यावेळी शहा यांनी उमेदवार ज्येष्ठ असेल तर त्यांनी निवडणूक कशाला लढवायची अशी विचारणा केली. यावेळी दोन्ही वकील आणि प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक झाली. 


प्रचारात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच 


दरम्यान, कारखान्याच्या सभासदांना कारखान्याच्या वजन काट्यावर पूर्ण विश्वास आहे अगदी कुठल्याही काट्यावर वजन करून आणला, तरी किलोचाही फरक आढळणार नाही. विरोधकांनी आरोप केला असेल मात्र त्यांच्या कारखान्याप्रमाणे आपल्याकडे 1200 किलोचा एक टन नसतो. त्यामुळे राजारामचे सभासद विरोधकांचा काटा या निवडणुकीत काढतील, असा टोला माजी आमदार अमोल महाडिक यांनी प्रचारार्थ कणेरी कणेरीवाडीमध्ये लगावला.


दुसरीकडे महाडिक स्वतःला शिरोलीचे म्हणतात मग राजाराम कारखान्यात शिरोली गावातील नवीन सभासद का केले  नाहीत? असा सवाल शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे यांनी केला. शिरोली पुलाचीत परिवर्तन आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटीलही उपस्थित होते. आमदार सतेज पाटील म्हणाले की, शिरोलीकरांना ऊस तोडीसाठी महाडिकांचे उंबरे झिजवावे लागणे हे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या महाडिकांना आता धडा शिकवा.


महत्वाच्या इतर बातम्या :