Rajaram Sakhar Karkhana : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर शहरातील कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निकाल आज (25 एप्रिल) लागणार आहे. कारखान्यासाठी रविवारी अत्यंत चुरशीने 91.12 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी विरोधी सतेज पाटील आणि सत्ताधारी महाडिक गटाकडून सर्वस्व पणाला लावून मैदानात होते. महाडिक गटाच्या ताब्यात सध्या एकमेव कारखाना असल्याने हा निकाल बरंच काही सांगून जाणारा असेल, यात शंका नाही. दोन्ही गटाकडून या निकालातून आगामी सर्व निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल, हे सुद्धा नव्याने सांगण्याची गरज नाही. कंडका पाडायचाच म्हणून सतेज पाटील निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे कंडका पडणार? की महादेवराव महाडिकांची शिट्टी पुन्हा एकदा घुमणार याची उत्सुकता आहे.

  


कशी होणार मतमोजणी? 


दरम्यान, मतमोजणी बावड्यातील रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात होईल. सकाळी आठ वाजल्यापासून दोन फेरीमध्ये 29 टेबलवर मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पहिले 29 आणि दुसऱ्या टप्प्यात पुढील 30 ते 58 या केंद्रांची मतमोजणी होणार आहे. पहिल्यांदा मतमोजणी हातकणंगले तालुक्यातील गावांपासून होणार आहे. त्यानंतर इतर गावांची क्रमाने होईल. संस्था गटातील मतमोजणी दुसऱ्या फेरीत होणार आहे. संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल. 


मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल बंदी 


दरम्यान, मतमोजणीसाठी मतदान केंद्रात येणारे मतमोजणी प्रतिनिधी हे कारखान्याचे सभासद असावे लागणार आहेत. निवडणूक रिंगणातील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल बंदी आहे. त्यामुळे ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या संस्था गटाची मतमोजणी दुपारनंतर सुरु होणार आहे. याच गटातून सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दीडशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. रात्रीपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


मतदानाचा टक्का वाढला


राजाराम कारखान्यासाठी अत्यंत चुरशीने प्रचार झाला होता. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून राजकीय धुळवडीत अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब मतदानातही दिसून आला. कारखान्यासाठी मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला झटका आणि कोणाला दिलासा देणार? याचीही उत्सुकता आहे. राजाराम कारखान्याची मागील निवडणूक 2015 मध्ये पार पडली होती. त्यावेळी 90 टक्के मतदान झाले होते. सत्ताधारी पॅनेलने सर्व जागा जिंकल्या होत्या. राजाराम साखर कारखान्याच्या संस्था गटातील एक व अन्य गटातील 20 अशा 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात आहेत. विरोधी आमदार सतेज पाटील परिवर्तन पॅनेलचे 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने या निवडणुकीत चुरस टोकाला गेली आहे. दोन्ही बाजूंकडून वैयक्तिक पातळीवर झालेल्या टीकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या