Amal Mahadik on Satej Patil : महाडिकांना बावड्यामध्ये फिरू देणार नाही असे म्हटले होते, त्यावेळी एकटे महादेवराव महाडिक सतेज पाटील यांच्या घरी गेले होते. त्यावेळी सतेज पाटील स्वतः घाबरून घरामध्ये बसले होते, बाहेर आले नव्हते, सतेज पाटील हे तोल गेल्यासारखं बोलत आहेत, अशा शब्दांत माजी आमदार अमल महाडिक यांनी सतेज पाटलांवर जोरदार पलटवार केला. सतेज पाटील यांच्याकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देत माजी आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत हल्ला चढवला. राजाराम साखर कारखान्याचे 29 उमदेवार अवैध ठरल्यानंतर सतेज पाटील यांनी महाडिक यांच्यावर महाडिक भ्याले, अशी टीका केली होती. याला अमल महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले. 


सभासदांचा हक्क घालवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंटी पाटील यांनी रडीचा डाव खेळला. डी. वाय. पाटील कारखान्याच्या सभासदांना अहवाल देखील सतेज पाटील दाखवत नाहीत, राजाराम साखर कारखाना हा सामान्य शेतकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांचाच राहणार, असेही ते म्हणाले. 


ते पुढे म्हणाले की, त्यांना निर्णयावर विश्वास नसेल तर न्याय देवतेचे दार ठोठवावं. निवडणूक आहे म्हटल्यानंतर आम्ही प्रचाराला बाहेर पडलो. विरोधी गटाचे उमेदवार, त्यांचे नातेवाईक हे देखील प्रचारासाठी बाहेर पडले आहेत. रात्रीचे काम करायची सवय आम्हाला नाही, त्यांचे लोकं रात्री का आले होते हे त्यांनाच माहिती असेल. विरोधकांनी ज्या ज्या गोष्टींची माहिती मागितली ती आम्ही दिली आहे, त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे होते. सतेज पाटील यांनी महाविकास आघाडी म्हणत पक्षीय राजकारण करत आहेत. जिल्हा बँकेची यंत्रणा राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत वापरली जात आहे. कुणाचा कंडका पडण्याची पद्धत कोल्हापूरकरांची नाही, हा राजाराम महाराज यांनी उभारलेला कारखाना आहे. 


अमल महाडिक यांनी सांगितले की, सतेज पाटील यांच्या राजकारणाची सुरुवात ही महादेवराव महाडिक यांच्यापासूनच झाली आहे. आम्ही लढणारे असून समोरुन लढत आहोत आणि जिंकणार आहोत. सरकारी यंत्रणेचा दबाव टाकून निकाल घेतला म्हणणाऱ्या सतेज पाटील यांनी स्वत: अधिकाऱ्यांना फोन करून पहावे. त्यांनी स्वत: पालकमंत्री म्हणून काम केले आहे. सरकारी यंत्रणेवर दबाव टाकून काम करता येते, हे पाटील यांच्या विचारातूनच आले आहे. आम्ही कधीही त्यांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला असे म्हणालो नाही. माझा न्यायालयावर विश्‍वास आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या :