Kolhapur News : गुंटाभर तुकड्यासाठी एकाच आईच्या पोटातून आलेले दोन भाऊ एकमेकांचे वैरी झाल्याचे पाहण्यास मिळत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आयुष्यभर जिवलग मित्र राहिलेल्या दोन सख्ख्या भावांची अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने मनाला चटका लावणारी 'एक्झिट' झाली. राधानगरी तालुक्यातील ठिकपूर्लीमधील विलास बाबुराव भंडारी (वय 81) व जयसिंग बाबुराव भंडारी (वय 63) या दोन सख्ख्या भावांचा अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. त्यामुळे चौघा भावांमधील दोन भावांची अशा पद्धतीने एक्झिट झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोघा भावांनी बंधूप्रेम जपल्याने आणि मृत्यूही अशा पद्धतीने आल्याने गावही हळहळले.
ठिकपूर्लीमधील विलास, जयसिंग मुरलीधर व प्रल्हाद हे सख्खे बंधू आहेत. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कापड व्यवसायात आपले स्थान निर्माण केले आहे. व्यवसायासोबत त्यांनी एकत्र कुटुंबही तितक्याच ताकदीने जपल्याने चौघा भावांमधील स्नेह नेहमी दिसून येत असे. मात्र, चौघांमधील दोघा भावांचा एकाच दिवशी झालेल्या मृत्यूने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. शनिवारी 8 एप्रिल रोजी दुपारी जयसिंग यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने धक्का बसल्याने अवघ्या पाच मिनिटांमध्ये थोरले बंधू विलास यांना जगाचा निरोप घेतला.
दोन जिवलग मित्रांची एकाचवेळी गळफास घेत आत्महत्या
दुसरीकडे, आठ दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील दोन जिवलग मित्रांनी कर्जाचा डोंगर वाढल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पारगाव येथे तात्यासाहेब कोरे वारणा मिलिटरी अकादमीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरात एका झाडाला दोघा मित्रांनी एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली होती. विनायक पाटील व मित्र बाबासाहेब मोरे यांनी एकाच झाडाला आत्महत्या केली. विनायक व बाबासाहेब मोरे जिवलग मित्र होते. बाबासो मोरे हा विनायक यांना सहकार्य करत होता. बाबासाहेब मोरे यांचा शेतीसह जनावरांचा गोठा आहे. दोघांनाही मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर असल्याने तणावात होते.
आर्थिक चणचण आणि कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने नैराश्यातून तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकादमीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरामध्ये एका झाडाला दोघांनीही दुचाकीचा आधार घेत सोबत आणलेल्या दोरीने झाडाच्या एकाच फांदीला एकाचवेळी आत्महत्या करत जीवन संपवले.