Satej patil on Dhananjay Mahadik : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सत्ताधारी महाडिक आघाडीचे नेते खासदार धनंजय महाडिक यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. महाडिक यांनी विजयाचा दावा केल्यानंतर विरोधी परिवर्तन आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी (Satej Patil on Dhananjay Mahadik) प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे. 


सतेज पाटील मतदानाचा हक्क बजावल्यानंतर म्हणाले की, "सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रियावर उत्तर द्यायला आमच्याकडे वेळ नाही. ऊसाला दोनशे रुपये दर का कमी मिळतो? हे आता शेतकऱ्यांना पटलेलं आहे. त्यामुळे परिवर्तनाची लाट आली आहे. अनेक गावात आमच्या बाजूने उत्साहात मतदान होत आहे. सत्ताधाऱ्यांकडे बूथ टाकायला जागा नाही, त्यामुळे यंदा छत्रपती राजाराम साखर कारखान्यात परिवर्तन होणार आहे. सभासदांना गृहित धरणं चुकीचं आहे. त्यामुळे धनंजय महाडिक यांच्या मोठ्या बोलण्याला अर्थ नाही." संस्था गटातील आमच्याकडे 75 मतदान असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. ते जर आमच्याकडे 90 आहेत म्हणत असतील, तर आमच्यासोबत आलेली 40 ते 50 लोक कोण आहेत? सभासदांना गृहित धरुन कोणी बोलत असेल तर ते चुकीचं आहे. 


काय म्हणाले होते धनंजय महाडिक?


धनंजय महाडिक यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर विजयाची ग्वाही दिली होती. महाडिक म्हणाले की, "छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीतून संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहेत. महादेवराव महाडिक हा जिल्ह्याचा जादूगार असल्याने निकाल सांगण्याची गरज नाही. राजाराम कारखान्याची निवडणूक आम्ही जिंकणार आहोत." ते पुढे म्हणाले की, संस्था गटातील 129 पैकी 90 मतदार आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे या ठिकाणी आम्हीच विजयी होऊ असा दावाही त्यांनी यावेळी केला. 


दोन्ही गटाकडून अत्यंत ईर्ष्येने प्रचार


या निवडणुकीसाठी दोन्ही गटाकडून अत्यंत ईर्ष्येने प्रचार झाला आहे. दोन्ही गटातील राजकीय कुस्ती एका कारखान्याच्या निवडणुकीसाठी थेट बिंदू चौकापर्यंत येऊन पोहोचली होती. त्यामुळे आता मायबाप सभासद काय कौल देतात याचे उत्तर 25 एप्रिलला मिळणार आहे. सत्ताधारी गटाकडून महादेवराव महाडिक यांच्यासह अमल, खासदार धनंजय महाडिक, शौमिका महाडिक यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. आमदार डॉ. विनय कोरे, माजी खासदार निवेदिता माने, आमदार प्रकाश आवाडे गटाने सत्ताधारी आघाडीला पाठिंबा दिला आहे. विरोधी गटाकडून विरोधी गटांकडून आमदार सतेज पाटील, बंधू डॉ. संजय पाटील, आमदार ऋतुराज पाटील मैदानात होते.


इतर महत्वाच्या बातम्या