Kolhapur Rain : गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने चांगलेच धूमशान घातले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह धरणांमधील पाणीपातळी वेगाने वाढत आहे. पंचगंगा नदी आज इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत पंचगंगा (panchganga river water level) 37 फुट 1 इंचावर जाऊन पोहोचली आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 77.7 मिमी पावसाची नोंद झाली.


जिल्हाधिकाऱ्यांकडून संभाव्य पुरग्रस्त भागाची पाहणी 


पंचगंगा नदी इशारा पातळीकडे जाऊ लागल्याने जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा (Kolhapur Rain) सक्रिय झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य पुरग्रस्त परिसराची पाहणी करून सूचना करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार  यांनी काल दिवसभरामध्ये शिरोळ तालुक्यातील संभाव्य पूर बाधित परिसराची पाहणी करून मार्गदर्शक सूचना केल्या. त्याचबरोबर नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ आल्यास निवारा शेड तसेच जनावरांना ठेवण्याची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. तसेच विविध योजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेत सूचना दिल्या आहेत.


दरम्यान, काल 12 धरण क्षेत्रांमध्ये अतिवृष्टी झाली. राधानगरी धरण 60 टक्के भरले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेल्याने जवळपास 100 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटल्याने अन्य मार्गाने वाहतूक केली जात आहे आणि दुसरीकडे धामणी खोऱ्यातील दहा गावांचा संपर्क तुटला आहे.


दरम्यान, प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड जागा निश्चित करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी जागांची निश्चिती केली आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या यापूर्वीच दाखल झाल्या आहेत. स्थानिक जवानांनाही जिल्हा प्रशासनाकडून सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे 


हातकणंगले- 14.6 मिमी, शिरोळ -8.8 मिमी, पन्हाळा- 43.4 मिमी, शाहूवाडी- 48.4 मिमी, राधानगरी- 51.1 मिमी, गगनबावडा-77.7 मिमी, करवीर- 30.2 मिमी, कागल- 26.3 मिमी, गडहिंग्लज- 18.9 मिमी, भुदरगड- 48.3 मिमी, आजरा-39  मिमी, चंदगड- 72.7  मिमी, असा एकूण 35.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या