कोल्हापूर : विधानपरिषद बिनविरोध निवडणूक करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद आला तर प्रयत्न करू, राज्यसभा निवडणुकीत आलेला अनुभव पाहता महाविकास योग्य निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात (Kolhapur) बोलताना दिली. चंद्रकांत पाटलांकडून महाविकास आघाडीला देण्यात आलेला हा दुसरा चर्चेचा प्रस्ताव आहे. त्यामुळे महाविकास आघाडी काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.


माझा आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोन कायम सुरू असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले. माणसाने कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न घेता काम करत राहिलं पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी तपास यंत्रणांवर होत असलेल्या आरोपांववरून भाष्य केले. त्यांनी सांगितले, की गेल्या काही दिवसांमध्ये तपास करणाऱ्या यंत्रणांवर दबाव आणायचं काम सुरू झालं आहे. कारवाई केली तर घेराव घालणार का तुम्ही ? हे चुकीचं असल्याचे ते म्हणाले.


त्यांनी ईडीच्या कारवाईवरून शरद पवार यांनाही खोचक टोला लगावला. तीन वर्षांपूर्वी एका नेत्याला ईडीची नोटीस आली त्यावेळी हजारोच्या संख्येनं आंदोलन केलं. कशाला ईडी पाहिजे मीच स्वतः ईडीकडे जातो म्हणत हजारो नागरिक गोळा केले, या सगळ्याचा ईडीवर काही परिणाम होणार नाही, असे सांगत त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही काय पेरता हे लक्षात आलं पाहिजे असेही त्यांनी सांगितले. 


काही सत्ताधारी आमदारांचा फडणवीस यांना पाठिंबा


राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीत काय होणार याकडं साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काही सत्ताधारी आमदारांनी फडणवीस यांना पाठिंबा असल्याचे सांगितलं असा दावा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणूक झाल्यास राज्यसभेप्रमाणे चमत्कार होणार याची चर्चा सुरु झाली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या