Chandrakant Patil On Rajya sabha vidhan parishad elections : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाल्यानं महाविकास आघाडीला जोरदार झटका बसला. या निवडणुकीत सरकारला समर्थन देणाऱ्या सहा अपक्ष आमदारांची मतं फुटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीत काय होणार याकडं साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काही सत्ताधारी आमदारांनी फडणवीस यांना पाठिंबा असल्याचे सांगितलं असा दावा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणूक झाल्यास राज्यसभेप्रमाणे चमत्कार होणार याची चर्चा सुरु झाली आहे. 


चंद्रकांत पाटील यांनी ये तो झंकी है 20 तारीख अभी बाकी है असं म्हणत दावा केला आहे की, विधानपरिषद निवडणुकीतही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. त्यांनी म्हटलं की,  राज्यसभेच्या झटक्यातून महाविकास आघाडी योग्य निर्णय करेल.  उद्या अर्ज माघारीची  शेवटची तारीख आहे. मत दाखवून निवडणूक होती त्यात सुद्धा आम्ही विजयी झालो.  विधानपरिषदेला तर गुप्त मतदान इथे आम्हाला प्रतिसाद जास्त मिळेल. देवेंद्रजींना अनेकांनी हात दाबून आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं सांगितलं आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.  


'2024 ला भाजप एकटं लढून राज्यात 42 ते 43 खासदार निवडून आणेल'


चंद्रकांत पाटील म्हणाले की,  2024 ला भाजप एकटा लढून राज्यात 42 ते 43 खासदार निवडून आणेल.  विधानसभा निवडणुकीत हाच आकडा 160 ते 170 असेल. हे माझं भाकीत आज लिहून घ्या, असंही ते म्हणाले. 


संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की,  ईडी हातात द्या, फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील हे वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असं आहे. आमदारांना का नोकर समजता का? बोलवून दम देता,विकास निधी रोखता. मी स्वतः याबाबत पिटीशन दाखल करणार आहे, असं त्यांनी म्हटलं.


बीडमध्ये झालेल्या गोंधळाबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की,  हल्ला करणारे कोण आहेत हे शोधावे लागेल.  पंकजाताईंवर खरे प्रेम करणारे कार्यकर्ते असतील तर ते अशी कृत्ये करून पंकजा ताईंची प्रगती रोखत आहेत. पक्ष त्या गोष्टीत इंटरटेन करणार नाही, असं ते म्हणाले.