Ambabai Mandir Navratri : शारदीय नवरात्रोत्सवाच्या उद्या शुक्रवारी पंचमीला त्र्यंबोली यात्रा सोहळा होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून जय्यत तयारी झाली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीकडून टेंबलाई टेकडी परिसरात विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ललित पंचमीला अंबाबाईची पालखी टेंबलाई टेकडीवर जाते. 


या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी लक्षात घेऊन तयारी करण्यात आली आहे. भाविकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगचेही नियोजन करण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षांनी पारंपरिक लवाजम्यात हा सोहळा होणार असल्याने मोठा उत्साह असेल. 


देवीच्या दर्शनासाठी भाविकांसाठी मोफत बससेवा


शारदीय नवरात्रोत्सवामध्ये पंचमीचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी टेंबलाई येथे मोठी यात्रा भरत असल्याने  लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. भाविकांना दर्शनासाठी जाणे सुलभ होण्यासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट यांच्या वतीने गेली आठ वर्षे मोफत बससेवा देण्यात येते. 


यावर्षीही भाविकांसाठी पंचमी दिवशी शुक्रवारी मोफत बससेवा असेल.बिंदू चौक ते टेंबलाई आणि परत बिंदू चौक अशी ही सेवा सुरू असेल. या मोफत बससेवेची वेळ सकाळी 6 ते रात्री 11पर्यंत असेल, या मोफत बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी केले आहे. 


पहिल्या तीन दिवसांमध्येच तीन लाखांवर भाविकांनी घेतले दर्शन


कोरोना महामारीमुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी दिवसागणिक वाढत चालली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मातेच्या दर्शनासाठी सोमवारी नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून बुधवारपर्यंत तीन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे. 


काल बुधवारी 1 लाख 49 हजार 580 भाविकांनी अंबाबाई मंदिरात दर्शन घेतले. मंगळवारी 1 लाख 44 हजार 921 भाविक आले होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला अधिकाऱ्यांना 5 ऑक्टोबरला दसऱ्यापर्यंत सुमारे 25 लाख भाविक मंदिरात भेट देतील अशी अपेक्षा आहे.


इतर महत्वाच्या बातम्या