Kolhapur News : माझ्यावर गद्दारीचे आरोप करणाऱ्या माजी आमदार के. पी. पाटील यांनी अनेक नेत्यांची फसवणूक केली असल्याने तेच गद्दारी व विश्वासघाताचे बादशाह असल्याची बोचरी टीका शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर (prakash Abitkar) यांनी केली होती. या टीकेनंतर आता के. पी. पाटील गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. हुतात्मा स्वामी- वारके सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष पंडितराव केणे यांनी प्रसिद्धीपत्रकातून प्रकाश आबिटकरांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
तुमचा गद्दार राजकीय प्रवास जनतेला ज्ञात
त्यांनी म्हटले आहे की, "50 खोके घेऊन मतदारसंघातील जनतेच्या मताची प्रतारणा केलेल्या गद्दारांनी ''केपीं''च्या नेतृत्वावर बोलण्याआधी आपली राजकीय कारकिर्द तपासावी. आबिटकर यांनी आपल्या राजकीय वाटचालीकडे मागे वळून पाहावे, म्हणजे गद्दारांच्या पंगतीत कोण आहे याचे उत्तर सापडेल. तुमचा गद्दार राजकीय प्रवास जनतेला ज्ञात आहे. मतदारसंघात मलीन झालेला जनाधार रोखण्याचा प्रयत्न म्हणून केपींच्या नेतृत्वावर टीका करण्याचा आपला केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.
पक्षप्रमुखांच्या विचारांशी केलेली प्रतारणा गद्दाराच्या पुढची
भास्कर ठाकूर यांच्या मदतीने आपण पंचायत समितीत प्रवेश केलात आणि भुदरगड पतसंस्था अडचणीत आल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडून दिलात. स्वहिताचा नारा जपत एकेकाळी ''एक नोट एक व्होट'' अशी साद घालत फिरणारे आबिटकर मतदारसंघात विकासाचे गाजर दाखवत आमदार झाले. अशा आमदारांनी पन्नास खोके घेवून गद्दारी केल्याची चर्चा राज्यभर व मतदारसंघातील जनतेमध्ये कायम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सूतगिरणी प्रकल्पासाठी 12 कोटी रुपयांचा निधी मिळविला. त्यावेळची निष्ठा बाजूला ठेवून पक्षप्रमुखांच्या विचारांशी केलेली प्रतारणा गद्दाराच्या पुढची आहे.
राज्यातील राजकीय उलथापालथीत स्वतःची आर्थिक पोळी भाजून घेण्यात यशस्वी ठरलेले आमदार आबिटकर यांच्याबद्दल समाजमनात गद्दार हा शब्द कायमस्वरूपी माथी लागल्याने आणि तो पुसून जाणार नसल्याने त्यांची झालेली हातबलता समजू शकतो. यामुळे आपल्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी के. पी. पाटील यांच्यावर ते टीका करीत असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
काय म्हणाले होते प्रकाश आबिटकर?
माझ्यावर गदारीचे आरोप करणाऱ्या माजी आमदार के पी पाटील यांनी अनेक नेत्यांची फसवणूक केली. यामुळे तेच गद्दारी व विश्वासघाताचे बादशाह आहेत. राज्यातील सत्ता बदलानंतर बाप लेकांना आमदारकीचे स्वप्न पडत आहे, त्यामुळे दोघांनी माझ्यावर बदनामीचा डाव रचल्याचा आरोप आमदार प्रकाश आबिटकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून आयोजित भुदरगड तालुक्यातील नूतन सरपंच उपसरपंच सदस्यांच्या सत्कार व समारंभात बोलताना केला होता.
के. पी. पाटील यांनी सत्तेच्या स्वार्थासाठी दिवंगत नेते हिंदुराव पाटील, नामदेवराव भोईटे व माजी आमदार दिनकरराव जाधव यांचा केलेल्या विश्वासघात जनतेला माहित आहे. त्यांचे आगामी निवडणुकीपूर्वी उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी अवस्था झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राधानगरी मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. तसेच विविध प्रकल्प संस्थांना मंजुरी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या