Kolhapur Nagarpalika Election 2022 : ओबीसी आरक्षण संदर्भात 19 जुलैला सर्वोच्च न्यायालयात होत असलेल्या महत्त्वपूर्ण सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम स्थगित केला आहे. त्यामुळे या नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रातील आचारसंहिताही संपुष्टात आली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 6 नगरपालिकांचा निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, वडगाव, मुरगूड आणि कुरूंदवाड या 6 नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.  


दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी सुद्धा अतिवृष्टीने महापुराची टांगती तलवार कायम आहे. जुलैच्या सुरुवातीपासून शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून पावसाळा पार पडल्यानंतर निवडणूक घ्याव्यात, अशी मागणी काल पत्र लिहून केली होती. 


कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 6 नगरपालिका निवडणूक प्रक्रिया तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदारयाद्याचे काम सुरु आहे. दुसरीकडे पंचगंगा नदीसह अनेक नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीकडे जात आहे. ज्याठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होत नाही त्या भागातील अधिकारी, कर्मचारी पूरप्रवण क्षेत्रात गुंतले आहेत. 


त्यामुळे याचा परिणाम निवडणुकीच्या कामावर होणार असल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक आणि निवडणूक पूर्वीचे कामकाज मान्सून कालावधी पूर्ण झाल्यानंतर घेतल्यास प्रशासन तसेच नागरिकांना सोयीचे होईल, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. आता निवडणूक आयोगाकडूनच सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम स्थगित मोठा दिलासा मिळाला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या