Murgud Nagarpalika: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल तालुक्यामध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे. मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक प्रवीणसिंह पाटील यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवीणसिंह यांचे भाऊ रणजीतसिंह पाटील यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. रणजीत सिंह पाटील यांच्याबरोबरच शिवसेना शिंदे गटाचे राजेखान जमादार यांनी हसन मुश्रीफ यांच्यासोबत राहण्याचे पसंत केलं. त्यामुळे यावेळी नगरपालिका निवडणुकीत हसन मुश्रीफ विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळणार आहे. मुरगुडमध्ये रणजीतसिंह पाटील आणि प्रवीणसिंह पाटील या दोन भावांमध्ये राजकीय वैर आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मुरगुडच्या नगरपालिकेत काटे की टक्कर होणार यात शंका नाही.

Continues below advertisement

मुरगूड गावचा दमदार माणूस म्हणजे प्रवीणसिंह पाटील 

प्रवीणसिंह पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, कागल तालुक्यातील मुरगूड गावचा दमदार माणूस म्हणजे प्रवीणसिंह पाटील होय. 30 ते 35 वर्षे पाटील घराण्याकडे नगरपालिकेची सत्ता असून त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मान पटकावला आहे. यावेळी मुरगूड नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. बिद्री सहकारी साखर कारखान्यातील एक अनुभवी संचालक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. प्रवीणसिंह पाटील यांनी केलेल्या भाजप प्रवेशामुळे कागल तालुक्यामध्ये भाजपला ताकद मिळाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सख्ख्या भावाबरोबर वैरत्व पत्करले

दुसरीकडे प्रवीणसिंह पाटील यांनी पक्ष सोडताना हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की, गेल्या वीस वर्षांपासून आपण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रामाणिक काम करत होतो. त्यांच्यासाठी सख्ख्या भावाबरोबर वैरत्व पत्करले. पण, वारंवार माझ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात हालचाली सुरू होत्या. कोणाच्या तरी सांगण्यावरून माझ्यावर, माझ्या गटावर अविश्वास दाखवला जात होता. यामुळेच आपण मुश्रीफ यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे प्रवीणसिंह पाटील यांनी जाहीर केले.

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या