Vishalgad Fort : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील विशाळगडावरील अतिक्रमणावरुन (Encroachment On Vishalgad) रणकंदन सुरु असतानाच शुक्रवारी (20 जानेवारी) पोलिसांनी धडक कारवाई करताना अवैध धंदे करणाऱ्यांना तसेच हुल्लडबाजांना चांगलाच दणका दिला. पोलिसांच्या पाच पथकांकडून विशेष धडक मोहीम राबवून 60 जणांवर कारवाई करण्यात आली. दारु, गांजा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा साठा तसेच ते विक्री करणाऱ्यांना 11 हजारांवर दंड ठोठावण्यात आला. गडावरील संशयित टपऱ्यांमध्ये पोलिसांनी घुसून कारवाई केली. पोलिसांना खबऱ्यांच्या माध्यमातून अवैध धंद्यांची माहिती मिळवली होती.
विशाळगडावर मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ, दारु आणि गांजा विक्री तसेच सेवन करुन हुल्लडबाजी करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने प्रतिबंध करण्याची मागणी होत होती. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमुख शैलेश बलकवडे यांनी अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाच पथकांकडून विशाळगडावर विशेष मोहीम राबवण्यात आली.
गजापूरला चेकपोस्ट होणार
विशाळगड गजापूर ग्रामपंचायत अंतर्गत येते. ग्रामपंचायतीने दारुबंदीचा ठराव करुनही दारू विक्रीसाठी उपलब्ध कशी होते? अशी विचारणा करत पुन्हा असा प्रकार दिसल्यास अधिक कडक कारवाईचा इशारा पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिला आहे. गजापूर इथे चेकपोस्ट करुन कायमस्वरुपी बंदोबस्त करणार असल्याचेही ते म्हणाले.
विशाळगडावर महाशिवरात्री उत्सव होणार
दरम्यान, विशाळगडावरील भगवंतेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बंडा साळुंखे, विनायक मईनकर यांनी आयोजनाची माहिती दिली. 18 फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता श्री भगवंतेश्वर मंदिरात विविध नद्यांचा जलाभिषेक, सकाळी सात वाजता गडफेरी अमृतेश्वर मंदिर, बाजीप्रभू, फुलाजी प्रभू समाधी दर्शन, कारसेवा अनवाणी पायाने नरवीर दौड, सकाळी अकरा वाजता भगवा ध्वज फडकणे, मुंडा दरवाजा येथे ध्वज फडकणे, दुपारी 12 वाजता भगवंतेश्वर मंदिराच्या ठिकाणी खिचडी वाटप, 1 वाजता ध्येयमंत्र प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमांची सांगता होणार आहे.
मतांची गोळाबेरीज विशाळगडच्या बाबतीत चालू देणार नाही
दरम्यान, "स्थानिक आमदारांनी शे-पाचशे मतांसाठी विशाळगडच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करु नये. आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमणे पाठिशी घातल्यानेच विशाळगडाची ही विषण्ण अवस्था झाली आहे", अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी 14 जानेवारी रोजी आमदार विनय कोरे यांचे नाव न घेता सुनावले होते. यानंतर आमदार विनय कोरे यांनी खुलासा केला होता. कोरे म्हणाले की, "छत्रपती संभाजीराजे हे माझे मित्र आहेत. मात्र, विशाळगडाबाबत त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट गैरसमजातून केली आहे. त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असावी. इतक्या मोठ्या जबाबदार व्यक्तीने अशा पद्धतीने फेसबुक पोस्ट करणे योग्य वाटत नाही".
इतर महत्वाच्या बातम्या