Dry port In Hatkanangale: बहुचर्चित कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhpaur News) हातकणंगले तालुक्यामधील मजले गावामध्ये प्रस्तावित ड्रायपोर्टला (Dry port In Hatkanangale) कायमस्वरूपी स्थगिती देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ड्रायपोर्ट होणारच असा दावा करणाऱ्या हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी जिल्ह्यातील उद्योग जगतासह शेतकरी आणि नागरिकांची दिशाभूल केली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यात नव्या ट्रायपोर्टला मंजुरी देता येणार नाही असं जेएनपीएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. गेल्यावर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापुरात बास्केट ब्रिजचे भूमिपूजन केल्यानंतर बोलताना ड्रायपोर्ट देण्याची घोषणा केली होती. यानंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र हा सपशेल फुसका बार ठरला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अनुकूल सुविधा असतानाही प्रस्तावित ड्रायपोर्ट बासनात गुंडाळल्याने शेतकरी, व्यापारी, उद्योजकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे रद्द झालेल्या ड्रायपोर्टवरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर निशाणा साधला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भुलभुलय्या दाखवणाऱ्यांचा फुगा फुटला अशी टीका शेट्टी यांनी केली.
राजू शेट्टी म्हणाले की, ड्रायपोर्ट होण्यासाठी काही निकष, नियम असतात. त्यासाठी प्रस्ताव द्यावा लागतो, त्यानंतर तो केंद्र सरकारकडे जात असतो. या अनुषंगाने कोणतीच हालचाल झालेली मला दिसून आलेली नाही. गेल्या वर्षभरात एवढ्या घोषणांचा सुकाळ झाला आहे तो पाहता त्या योजनांसाठी लागणारा निधी याची बेरीज केल्यास राज्याचा दहा वर्षाचा महसूल खर्च करावा लागेल. कर्मचाऱ्यांना पगार कसे देणार? केलेल्या विकासाच्या घोषणांवर दहा वर्षांचा निधी पुरणार नाही. केवळ दिशाभूल करण्यासाठी आणि आपण काही करुन दाखवतोय हे दाखवण्यासाठी होत असेल, तर या घोषणांचे असेच होणार.
त्यामुळे जेएनपीएने दिलेल्या माहितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह सांगलीमध्येही ड्रायपोर्ट होणार नसल्याचे सांगितल्याने खासदार धैर्यशील माने यांनी आजपर्यंत केलेले दावे, दिलेली माहिती यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांना ड्रायपोर्ट मृगजळ ठरले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या