Aaditya Thackeray : ठाणेकर बंडवीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर शिवसेनेत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाचे आणि पक्षप्रमुखांचे सरकार पाडण्याचा पराक्रम करताना आता चिन्हावरही दावा केला आहे. शिवसेना आणि बंडखोर शिंदे कळपाची लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. या लढाईत सर्वोच्च न्यायालयात शिवसेना विधिमंडळ पक्ष आणि शिवसेनेची अस्मिता असलेला धनुष्यबाण कोणाचा? यावर निर्णय होईल. त्याचबरोबर अपात्रतेची टांगती तलवार सुद्धा आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. 


त्यामुळे शिवसेनेची नव्याने संघटनात्मक बांधणी तसेच नेत्यांनी बंडखोरी केल्यानंतर निष्ठावंत शिवसैनिकांना पुन्हा एकदा चार्ज करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आता कंबर कसली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईत बंडखोरांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा पार पडल्यानंतर त्यांची आता राज्यभरातील बंडखोरांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा पार पडत आहे. मराठवाड्यात शिवसंवाद यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर त्यांची शिवसंवाद यात्रा व्हाया कोकण पार करून कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली.  




कोल्हापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेला अभूतपूर्व खिंडार पडले. जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या बंडखोरीनंतर जिल्ह्यातील शिवसेनेची भिस्त माजी आमदार आणि निष्ठावंत शिवसैनिकांवर येऊन पडली आहे. 


राज्यसभा निवडणुकीपासून कोल्हापूरचे राजकारण राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. शिवसेनेने संभाजीराजे यांना पायघड्या घालूनही नकार दिल्यानंतर संजय पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देऊन मोठा डाव खेळला होता. मात्र, स्वकीयांनी घात केल्याने संजय पवार यांचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला. ही पक्षात पडलेली पहिली ठिणगी होती. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेना पूर्णत: फुटली. 




आजऱ्यातील आदित्य यांच्या अभूतपूर्व स्वागताने राजकीय भूवया उंचावल्या 


या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने त्यांचे स्वागत कसे होणार? याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचेही लक्ष होते. आदित्य यांची शिवसंवाद यात्रा सिंधुदुर्गमधून आजऱ्यात पोहोचली. आजरा तालुका कोल्हापूर शहरापासून तब्बल 86 किमी अंतरावर आहे. कोल्हापूर शहरामध्ये शिवसेना खोलवर रुजली असली, तरी आजऱ्यामध्ये शिवसेनेचा कोणताही मातब्बर नेता नसताना आदित्य यांच्या स्वागताला झालेली गर्दी ही नक्कीच जवळचा भाग म्हणून बंडखोर आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार संजय मंडलिक यांना नक्कीच विचार करायला भाग पडणारी आहे. आदित्य यांच्या स्वागताला जसा शिवसैनिक होता, त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकही होता. त्यामुळे भविष्यातील आडाखे आणि गटाचा विचार करून बंडाळी केली असली, तरी बंडखोर प्रकाश आबिटकर आणि संजय मंडलिक यांची वाटचाल नक्कीच सोपी नाही, याची जाणीव या गर्दीने करून दिली आहे. 




कोल्हापूर शहरातही जंगी स्वागत 


शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने कार्यकारिणी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. शहरप्रमुखपदाची जबाबदारी सुनील मोदी आणि रवी इंगवले यांच्याकडे दिली आहे. मिरजकर तिकटीला झालेल्या सभेलाही आदित्य यांनी स्टेजवरून भाषण न करता थेट खाली उतरून भाषण केल्याने शिवसैनिकांमध्ये चांगलाच उत्साह संचारला. आदित्य ठाकरे गद्दारांना साथ देणार का? असे विचारताच शिवसैनिकांकडून मिळालेला प्रतिसाद जोरदार होता. पावसाच्या सरी येऊनही शिवसैनिक आदित्य यांचे भाषण ऐकत होता. भाषण करत असताना समोरील गर्दीला मध्येच प्रश्न विचारण्याची आदित्य यांची शैली शिवसैनिकांच्या भावनेला हात घालणारी होती. 


जयसिंगपुरातील स्वागत बंडखोर धैर्यशील माने, यड्रावकरांच्या चिंतेत भर घालणारे 


आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूरनंतर सभेसाठी बंडखोर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि खासदार धैर्यशील माने यांच्या मतदारसंघात येणाऱ्या जयसिंगपूरची निवड केली. वास्तविक कोल्हापूर ते जयसिंगपूर हे अंतर गाठण्यास 40 ते 45 मिनिटे लागतात. मात्र, हे अंतर पार करेपर्यंत आदित्य ठाकरे यांच्या ताफ्याला तब्बल दीड तास लागला.


जयसिंगपूरकडे जात असताना प्रत्येक गावात आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत शिवसैनिक आणि नागरिकांकडून करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी देखील आपला ताफा थांबवून तमाम शिवसैनिकांची तसेच नागरिकांची भेट घेतली. प्रत्येक पाच किलोमीटरवर गाडीतून उतरून ते नागरिकांचे पुष्पगुच्छ स्वीकारत होते. आदित्य ठाकरे यांच्या ताफ्याच्या दोन्ही बाजूला शेकडो दुचाकीस्वार हातात भगवा झेंडा घेऊन ताफ्यात सहभागी झाले होते. त्यामुळे राजेंद्र पाटील यड्रावकर आणि धैर्यशील माने यांना एकप्रकारे इशाराच मिळाला आहे. 




शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेच्या उल्हास पाटील यांचा 2019 मध्ये पराभव केला. त्यांनी जयसिंगपूरमध्ये पोहोचताच हा मतदारसंघ उल्हासदादांचाच असल्याचे सांगत 2024 ची दिशा स्पष्ट केली. दुसरीकडे खासदार धैर्यशील माने यांचे राजकारण सत्ता तिकडे चांगभलं असेच राहिले आहे. त्यांनी बंडखोरीचा निर्णय दिल्लीतून घेताना एक आॅडिओ क्लीप व्यवस्थित  व्हायरल होईल, याची काळजी घेतली होती. शिवसैनिकांनी काढलेल्या मोर्चालाही त्यांनी विरोध न करण्याचे आवाहन केले होते. असे असले, तरी बंडखोरीनंतरही त्यांचे मतदारसंघात दर्शन अजूनही झालेले नाही. त्यापूर्वीही त्यांचे दर्शन दुर्मिळच होते. त्यामुळे त्यांना थेट इशारा मिळाला आहे. 


आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील तिन्ही भाषणांमध्ये फक्त गद्दार, खंजीर आणि पाठीत वार  हेच शब्द सातत्याने येताना दिसले. त्याचबरोबर जे फसवून शिंदे गटात गेले आहेत, त्यांनाही मातोश्रीवर येण्यासाठी साद घालत होते. मात्र, ते 40 गद्दार असा सातत्याने म्हणत असल्याने हे थोडे कोड्यात टाकणारे होते.  




कोल्हापूरकरांचा इतिहास बंडखोरांना माफी नाहीच


कोल्हापूरच्या निवडणुकीत नेहमी बंडखोरांना माफी नाहीच, असाच इतिहास राहिला आहे. येथील जनेतेने नेहमीच स्वाभिमानाला साथ दिली आहे. त्यामुळेच जे राज्यात घडतं ते कोल्हापूरमध्ये कधीच घडत नाही हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे बंडखोरांच्या मतदारसंघातील आदित्य यांच्या शिवसंवाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता शिवसेना बंडखोरांची जिल्ह्यातील मार्ग खडतर असणार आहे याचेच संकेत दिले आहेत.