Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व कायम कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरक व दीपावली तसलमाल अदा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये प्रमाणे दीपावली तसलमात देण्यात आली आहे. परंतु, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना यापैकी कोणताही लाभ देता आला नव्हता.  त्यामुळे ठोक मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांची ऑक्टोबरमधील वेतन आगाऊ देण्याची मागणी होती. 


त्यानुसार प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आस्थापना विभागाला आदेश देऊन शुक्रवारी सर्व ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांचे हजेरी पत्रक मागून घेऊन तातडीने या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याच्या सूचना आस्थापना अधीक्षकांना  दिल्या. त्याप्रमाणे या कर्मचाऱ्यांच्या पत्रकाची अंमलबजावणी करुन 224 कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचे वेतन आदा करण्यात आले. या सर्व 224 कर्मचाऱ्यांना 39 लाख 40 हजार इतके वेतन महापालिकेने अदा केले. त्यामुळे या ठोक मानधनवरील कर्मचाऱ्यांची सुद्धा दिवाळी गोड झाली आहे.


शहरातील दिव्यांगांच्या बँक खातेमध्ये अनुदान जमा


दुसरीकडे दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 5 टक्के निधीतून शहरातील दिव्यांगांच्या बँक खात्यात अनुदान जमा बुधवारी जमा करण्यात आले. सन 2022-23 चा आर्थिक वर्षामध्ये शासन निर्णयानुसार महानगरपालिकेमार्फत दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या 5 टक्के निधीचा प्रशासक दप्तरी ठराव करण्यात आला आहे. यामधील दिव्यांगांना रोख स्वरूपात आर्थिक सहाय्य देण्याची योजना आहे. दिवाळीपूर्वी नोंदणीकृत दिव्यांगांना हा लाभ देण्यात आला. 


दिव्यांगांच्या 21 प्रकारांमध्ये ज्या दिव्यांगांचे दिव्यांगत्व 70 टक्के पेक्षा जास्त आहे अशा 855 दिव्यांगांना दरमहा 1500 प्रमाणे सहा महिन्यांचे प्रत्येकी  9 हजार जमा करण्यात आले. 70 टक्के पेक्षा कमी दिव्यांगत्व असणाऱ्या 1345 दिव्यांगांना दरमहा 1 हजार प्रमाणे 6 हजार जमा करण्यात आले.


कुष्ठरोगी बांधवांचे अनुदानही जमा 


68 कुष्ठरोगी बांधवांना दरमहा 1500 प्रमाणे सहा महिन्यांचे 9 हजार अनुदान जमा करण्यात आले. ज्या दिव्यांगांच्या खात्यावर काही तांत्रिक अडचणीमुळे निधी जमा झालेला नाही, अशा दिव्यांग बांधवानी महापालिकेच्या दिव्यांग कक्षास संपर्क साधावा असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.