Ambabai Mandir Navratri : यंदाचा नवरात्र उत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय होणार असल्याची ग्वाही कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंबाबाई मंदिरात प्रवेशासाठी ई-पास किंवा ऑनलाइन दर्शन पास लागू करणार नाही.


कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांच्या काळात, मंदिर मोठ्या प्रमाणात भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. तसेच  प्रवेशास परवानगी असलेल्या लोकांची संख्या, सक्तीचे ऑनलाइन बुकिंग इत्यादी निर्बंध घालून मंदिर उघडण्यात आले होते. यावर्षी मंदिरात दररोज सुमारे एक लाख भाविक येण्याची शक्यता आहे. 


पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अतिरिक्त प्रभारी आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, गेल्यावर्षी महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांना ऑनलाइन दर्शन पास अनिवार्य करण्यात आला होता. यावर्षी असा कोणताही पास अनिवार्य नसून भाविकांना कोणत्याही निर्बंधाशिवाय देवीचे दर्शन घेण्याची मुभा असेल. यावर्षी, कोविड पूर्वीप्रमाणेच नवरात्र साजरे केले जातील आणि त्याची तयारी आधीच सुरू झाली आहे.


ते म्हणाले की, अंबाबाई मंदिर परिसरातील सर्व निवासस्थान आणि हॉटेलमध्ये भाविकांसाठी मोफत वॉशरूम सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्याची माहिती देणारे डिस्प्ले बोर्ड अनेक ठिकाणी लावण्यात येणार आहेत. रेखावार पुढे म्हणाले की, भक्त निवास आणि पार्किंग सुविधेचे बांधकाम संथ गतीने सुरू असल्याने लवकरच गती वाढवण्याचे नियोजन करत आहोत. टेंबलाई टेकडीवरील सुशोभीकरण आणि मंदिर विकासाबाबत बोलताना रेखावार म्हणाले, टेंबलाई मंदिर आणि टेकडी विकासाची ब्लू प्रिंट तयार आहे.


मंदिर आणि त्याचा डोंगराळ भाग लक्षात घेऊन हे काम केले जाईल. वार्षिक जत्रेच्या वेळी स्थानिक दुकानदार, भाविकांच्या गर्दीचा विचार करण्यात आला असून लवकरच कामे सुरू होतील, असेही त्यांनी नमूद केले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या