Ambabai temple : कोल्हापुरातील प्रसिद्ध साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात सोमवारी पारंपारिक पद्धतीने तोफांच्या फैरी झाडून बहुप्रतिक्षित नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. येथे वापरलेली तोफ 200 वर्षांहून अधिक जुनी आहे. नवरात्र सुरू होण्यासाठी मंदिरात तोफांच्या फैरी झाडण्याची प्रदीर्घ परंपरा आहे.


उत्सव कालावधीत देवीच्या मूर्तीची विविध नऊ रूपांमध्ये सजावट करण्यात येणार असून पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी झाली होती. महामारीच्या दोन वर्षांनंतर हा सण साजरा होत असल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत सुमारे 25 लाख भाविक भेट देतील अशी अपेक्षा आहे.


पहिल्या दिवशी सिंहासनारूढ रुपात पूजा


करवीर निवासिनी अंबाबाई देवीची आज पहिल्या दिवशी सिंहासनारूढ या रूपात पूजा बांधण्यात आली. करवीर निवासिनी सिंहासनावर विराजमान होऊन भक्तांना दर्शन देत आहे अशा स्वरूपाची पूजा आहे. सिंहासनामध्ये सिंहाचा मुखवटा, पाय, यांच्या आकाराचा अंतर्भाव असतो. कारण सिंह है शौर्य, सामर्थ्य, वैभव, ऐश्वर्या,  सत्ता याचे प्रतीक आहे.  सिंहासनावर विराजमान होणारे देव व राजे हे सार्वभौम दर्शवितात. श्री महालक्ष्मी ही विश्वाची सार्वभौम सत्ताधीश आहे. म्हणूनच आज नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीची राजराजेश्वरी स्वरूपात सिंहासनारूढ पूजा बांधण्यात आली. ही पूजा श्रीपूजक अनिल कुलकर्णी, नारायण कुलकर्णी आणि गजानन मुनीश्वर यांनी बांधली


दरम्यान देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसर भाविकांनी फुलला आहे.


दरम्यान, कोल्हापूर पोलिसांकडून नवरात्रोत्सव काळात सुरक्षेसह वाहतूक मार्गात बदल केले आहेत. शहरातील अनेक मार्गावर एकेरी वाहतूक तसेच अवजड वाहनांना वाढीव बंदी करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरामध्ये 11 ठिकाणांवर पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल. 


अवजड वाहनांना वाढीव बंदी


पोलिसांकडून शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना रात्री आठ ते सकाळी 10 यावेळेत अंबाबाई मंदिर परिसरात 5 ऑक्टोबरपर्यंत वाढीव बंदी घालण्यात आली आहे. सीपीआर चौक, सोन्या मारुती चौक, तोरस्कर चौक, गायकवाड बंगला, गंगावेश, रंकाळा स्टँड, तटाकडील तालीम, तांबट कमान, जुना वाशी नाका, देवकर पाणंद पेट्रोल पंप चौक, इंदिरा सागर चौक, रेसकोर्स नाका, गोखले कॉलेज, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, उमा टॉकीज, फोर्ड कॉर्नर, कोंडा ओळ, दसरा चौकातून अंबाबाई मंदिराकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना रात्री 8 ते सकाळी 10 पर्यंत वाढीव बंदी केली आहे.


एकेरी मार्ग


दुसरीकडे महाद्वार रोडवर चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी असेल. दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी हा मार्ग खुला असला, तरी गर्दी झाल्यास बंद करण्यात येईल. बिंदू चौक ते वणकुंद्रे भांडी दुकान ते पापाची तिकटी, भेंडे गल्ली रोड नेहमीप्रमाणे एकेरी राहील. केएमटी बसेस छत्रपती शिवाजी चौकाकडे जाणार नाहीत. 


इतर महत्वाच्या बातम्या