Kolhapur News : ऊस दर जाहीर न करताच ऊस तोड करून वाहतूक केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोडावत फॅक्टरीची ऊस वाहतूक रोखली. ऊस घेऊन चाललेल्या ट्रॅक्टरची हवा सोडून देत ऊस दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोड करू नये, असा इशारा देत ऊस तोड बंद पाडली. आळते (ता. हातकंणगले) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोडावत फॅक्टरीची ऊस वाहतूक रोखली.  


स्वाभिमानीची 15 ऑक्टोबरला ऊस परिषद  


दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊस परिषद 15 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे होत आहे. उस दर किती घ्यायचा याचा निर्णय ऊस परिषदेमध्ये होणार आहे. तत्पूर्वीच घोडावत फॅ क्टरीमार्फत दर जाहीर न करताच आळते परिसरात ऊस तोड सुरू केली होती. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत उसाच्या गाड्या अडवल्या. ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडून देऊन पुन्हा ऊस तोड करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.


एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा आमदार हसन मुश्रीफ यांची घोषणा


स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद 15 ऑक्टोबरला होणार असली, तरी या परिषदेपूर्वीच एक रकमी एफआरपी देण्याची घोषणा आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे. त्यामुळे एक प्रकारे स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी निर्माण केलेल्या रेट्यामुळेच ही भूमिका घ्यावी लागल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे नियोजित ऊस परिषदेवर राजू शेट्टी ठाम असून ते काय भूमिका घेतात ते औत्सुक्याचे असेल. 


गेल्या हंगामात शाहूने एकरकमी एफआरपीची घोषणा करत कोंडी फोडली होती. मुश्रीफ यांनी चालू हंगामात घोषणा करत शाहूला शह दिला आहे. मुश्रीफांनी घोषणा करताना अनेक कारखानदार उपस्थित होते. 


अधिकच्या एफआरपीची मागणी केल्यास संघर्ष अटळ


गेल्या हंगामात शंभर टक्के एफआरपी देण्यात कोल्हापूर आघाडीवर आहे. गेली दोन वर्षे कोल्हापूर वगळता अन्य जिल्ह्यात एफआरपी दोन-तीन टप्प्यात दिली जाते. दुसरीकडे, राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली संघटनेची ऊस परिषद 15 ऑक्टोबरला होत आहे. या परिषदेत शेट्टी यांनी अधिकच्या एफआरपीची मागणी केल्यास संघर्ष नाकारता येत नाही. मात्र, कोंडी फोडण्याचा प्रयत्न मुश्रीफ यांनी केला आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या