Ambabai Mandir Navratri : सोमवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. अंबाबाई मंदिर परिसरात 700 पोलिस कर्मचारी आणि 2,000 होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. बॉम्बशोधक पथक दररोज चार वेळा मंदिर परिसराची तपासणी करणार आहे. 


कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रादरम्यान सुमारे 12-15 लाख भाविकांनी मंदिराला भेट देण्याची अपेक्षा आहे. मंदिर परिसरात 82 आणि महाद्वार रोडलगत 40 कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. बॉम्बशोधक पथकातील प्रशिक्षित श्वान दिवसातून चार वेळा मंदिर परिसराची पाहणी करतील. याशिवाय वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरभर 250 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.


वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी सांगितले की, महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता मंदिर परिसरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करणे आवश्यक आहे. त्यानुसार रात्री दहा वाजेपर्यंत शहर परिसरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. नवरात्राचे नऊ दिवस महाद्वार रोडवर चारचाकी वाहनांना प्रवेश पूर्णपणे बंदी असेल. रिक्षा आणि दुचाकींना परवानगी असेल, परंतु गरज भासल्यास गर्दीच्या वेळी त्यांचा प्रवेश देखील बंद केला जाऊ शकतो. महाद्वार रोडवरील व्यापार्‍यांचे सामान व साहित्य घेऊन येणाऱ्या वाहनांना रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच प्रवेश दिला जाईल.


10 हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार 


दरम्यान, अंबाबाई मंदिरात सुमारे 10 हजार भाविकांना भोजन-प्रसादाचा लाभ घेता येणार आहे. महालक्ष्मी अन्नछत्राचे अध्यक्ष राजू मेवेकरी म्हणाले की, महालक्ष्मी धर्मशाळा (वसतिगृह) आणि महालक्ष्मी अन्नछत्र (प्रसाद विभाग) यांनी विशेष व्यवस्था केली आहे. वसतिगृह 24x7 चालेल आणि अन्नछत्र दररोज 1 हजार भाविकांना मोफत जेवण देईल.


वाहतूक मार्गात बदल


कोल्हापूर पोलिसांकडून नवरात्रोत्सव काळात सुरक्षेसह वाहतूक मार्गात बदल केले आहेत. शहरातील अनेक मार्गावर एकेरी वाहतूक तसेच अवजड वाहनांना वाढीव बंदी करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरामध्ये 11 ठिकाणांवर पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल. 


इतर महत्वाच्या बातम्या