Nagpur Ratnagiri National Highway : कोल्हापूर जिल्ह्यातून जात असलेल्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून कडाडून विरोध होत असतानाच आता दुसऱ्या बाजूने सुरू असलेल्या नागपूर रत्नागिरी महामार्गाला सुद्धा शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शिये, भुयेवाडी, भुये या परिसरातील शेतकऱ्यांनी आज पाणंद रस्ता बंद झाल्याने आक्रमक भूमिका घेतली. या महामार्गाची पूर्णपणे नव्याने निर्मित होत असल्याने अनेक ठिकाणी पर्यायी रस्ता नसल्याने शेतकरी आक्रमक झाले. 


आम्हाला किंमत आहे की नाही?


यावेळी शेतकऱ्यांनी काम घेतलेल्या ठेकेदारासह अधिकाऱ्यांना सुद्धा धारेवर धरले. यावेळी शेतकऱ्यांनी प्रेशर आणत असल्याचा आरोप करत आम्हाला किंमत आहे की नाही? अशी विचारणा अधिकाऱ्यांकडे केली. अधिकाऱ्यांकडून मोबदल्याचा मुद्दा उपस्थित होताच आम्ही मेल्यावर मोबदला द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली. 


शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अधिकारी व ठेकेदारांनी तुम्हाला सोयीस्कर असेल त्या पद्धतीने काम करून देतो, असे सांगण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या खालून ओव्ह साईज पाईप टाकावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. त्या ओव्हर साईज पाईपमधून शेतकऱ्यांच्या पीव्हीसी पाईप शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी नेता येतील, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. तुम्ही काम नीट करा, आम्ही तुमची अडवणूक करण्यासाठी कशाला येऊ? असेही शेतकऱ्यांनी यावेळी सांगण्याचा प्रयत्न केला. 


शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा 


दरम्यान, पुन्हा एकदा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विरोधात वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात तापण्यास सुरुवात झाली आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावे बंद ठेवून सहकुटुंब 18 जूनला दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांची जमीन शक्तीपीठासाठी जाणार आहे. मात्र अल्प प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा विरोध आहे. 


28 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी करत बारा जिल्ह्यातील गोवा ते नागपूर या शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन संपादन करत असल्याचे जाहीर केले. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यांमध्ये आंदोलने सुरू आहेत. यासाठी सर्वपक्षीयांची मोट बांधून पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात शहाजी कॉलेजमध्य बैठक झाली होती. या बैठकीस आमदार सतेज पाटील , भारत पाटणकर , कॅाम्रेड गिरीश फोंडे यांचेसह जिल्ह्यातील शेतकरी व पदाधिकारी ऊपस्थित होते. 


इतर महत्वाच्या बातम्या