कोल्हापूर : 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे आदी प्रक्रिया पार पाडताना पैशांची मागणी होणार नाही, याची दक्षता घ्या. महिलांची अडवणूक, दिरंगाई करुन पैसे घेतल्याचे आढळून आल्यास पोलीस प्रशासनाची मदत घेवून दोषींवर कडक कारवाही करा. कोणत्याही परिस्थितीत दलालांचा सुळसुळाट होऊ देऊ नका, असे स्पष्ट निर्देश कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. योजनेच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहिल यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 


जास्तीत जास्त महिलांची नोंदणी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा


कोल्हापुरात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने"ची आढावा बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. मुश्रीफ म्हणाले की, या योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तथापि 19 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांची नोंदणी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. तालुकास्तरीय समित्या तात्काळ स्थापन करा. या योजनेअंतर्गत झालेल्या नोंदणीचा दररोज आढावा घ्या. लाभार्थ्यांना विनासायास लाभ मिळवून देण्यासाठी चोख नियोजन करा. या योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांची नोंदणी होण्यासाठी तसेच नोंदणी करताना लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे, छाननी करणे व ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देऊन गावनिहाय शिबिरांचे आयोजन करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 


योजनेतील पात्र महिलांना महिन्याला 1 हजार 500 रुपये म्हणजे वर्षाला 18 हजार रुपये राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार आहेत. 31 ऑगस्ट पर्यंत नोंद झालेल्या सर्व लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा लाभ देण्यात येणार असून सर्व महिलांनी अर्ज नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, या योजनेसाठी "नारी शक्ती दुत" ॲपवर निःशुल्क ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध आहे. कोणतीही अडचण आल्यास तहसीलदार, गटविकास अधिकारी अथवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्ह्यात अधिकाधिक लाभार्थ्यांची नोंदणी होण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची तसेच आतापर्यंत झालेल्या नोंदणीची माहिती दिली.


इतर महत्वाच्या बातम्या