Kolhapur Airport : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूर विमानतळावरून आज मुंबई-कोल्हापूर विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राजकीय टोलेबाजी चांगलीच रंगली. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर विमानतळावरून राजकीय कुरघोडी रंगल्याचे दिसून आले. कोल्हापूर जिल्ह्यातील सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. तो सुद्धा यावेळी पुन्हा एकदा दिसून आला.
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा शुभारंभ कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये खासदार धनंजय महाडिक यांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व नेत्यांचा समावेश आहे. समस्त कोल्हापूर या नावाने ही जाहिरात आहे. त्यामुळे हाच धागा पकडून खासदार धैर्यशील माने यांनी भाषण केले.
धैर्यशील माने म्हणाले, की संजय घोडवत यांच्या संजय नावामध्ये सतेज पाटील यांच्या नावातील 'स' आणि धनंजय महाडिक यांच्या नावातील 'जय' असा उल्लेख आहे. त्यामुळे माने यांनी दोघांच्या नावाचा धागा जोडताच खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला लगावण्याची संधी सोडली नाही.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, विमानतळाच्या या कार्यक्रमाची एक जाहिरात देण्यात आली. त्यामध्ये धनंजय महाडिक वगळता जिल्ह्यातील सगळे नेते आहेत. समस्त कोल्हापूरकर या नावाने ही जाहिरात दिली आहे. मात्र, काम केलं असलं, की जाहिरात करण्याची गरज नाही. त्यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला.
दरम्यान, यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ यांनी 64 एकरचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे. संजय घोडावत ग्रुपची ही सेवा थेट न्यूयॉर्कपर्यंत पोहचावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर - मुंबई विमानसेवा आजपासून पुन्हा सुरू
- संजय घोडवत यांच्या स्टार एअर कंपनीची सेवा आजपासून सुरू
- आठवड्यातील मंगळवार, गुरुवारी आणि शनिवारी असेल विमानसेवा
- कोल्हापूर ते मुंबईसाठी 2 हजार 573 रुपये इतका तिकीट दर असेल
- मुंबईतून सकाळी 10.30 वाजता टेकऑफ तर कोल्हापुरात 11.20 वाजता लँडिंग
- कोल्हापुरातून सकाळी 11.50 वाजता टेकऑफ तर मुंबईत 12.45 वाजता लँडिंग होणार
दुसरीकडे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना ही सेवा सोयीची ठरणार आहे. सध्या कोल्हापूरातून तिरुपती, बंगळुरू, अहमदाबाग, हैदराबाद या शहरात सध्या विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या