कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात 58 पैकी आज महायुतीकडे 41 जागा आहेत. यावेळी 48 ते 49 जागा निवडून येतील या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूरमधील दहा पैकी चार जागा भाजपने लढवाव्यात अशी विनंती आम्ही केली आहे. महायुती म्हणून जास्तीत जास्त जागा निवडून येतील, असे आमचे प्रयत्न असल्याचे भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनानंतर खासदार महाडिक यांनी (Dhananjay Mahadik on Rajesh Kshirsagar) कडक प्रत्युत्तर दिलं आहे. 


तर आमची उत्तरमध्ये 80 हजार मतं आहेत


कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावरून सुरु असलेल्या वादावर धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर भाजपने पहिल्यापासूनच दावा केला आहे. पोटनिवडणुकीत आम्हीही जागा लढवली असून80 हजार मतदान घेतलं आहे. राजेश क्षीरसागर यांनी घेतलेला मेळावा कोणावर दबाव टाकण्यासाठी असू नये. ते जर दक्षिणमध्ये आमची 15 हजार मतं आहेत असं म्हणत असतील, तर आमची उत्तरमध्ये 80 हजार मतं आहेत. एकमेकांना सोबत घेऊन गेलो तरच आपण जागा निवडून आणू शकतो, निवडणुकीच्या तोंडावर गैरसमज होणारे मेळावे होऊ नयेत, असा टोलाही महाडिक यांनी क्षीरसागर यांना लगावला. 


जागावाटपावर काय म्हणाले?


महाडिक यांनी सांगितले की, महायुतीच्या जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. भारतीय जनता पार्टीने आपल्या पदाधिकाऱ्यांना बोलवून आढावा घेतला आहे. दरम्यान, अजित पवार महायुतीमधून बाहेर पडण्याचा प्रश्नच येत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता येत असताना अजित दादांचा मोठा वाटा असेल, असेही त्यांनी नमूद केले. 


दुसरीकडे,  कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिणवरुन महायुतीमध्ये कलगीतुरा रंगला असतानाच आता कागलमध्येही महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे. माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव  वीरेंद्र मंडलिक यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागत स्वत: कागल विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे म्हटले आहे. या वादावर खासदार धनंजय महाडिक यांना विचारणयात आले असता त्यांनी मी नुकताच कोल्हापूरमध्ये आलो आहे. वीरेंद्र मंडलिक काय बोलले मला माहीत नसल्याचे म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या