कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Loksabha Election 2024) एबीपी माझा प्रस्तुत "मतदारसंघाच्या शोधात जय वीरू" ही जोडी आज (29 मार्च) कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पोहोचली. यावेळी जय वीरुसोबत कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil on Dhananjay Mahadik) सहभागी झाले. यावेळी जय वीरूने अर्थातच सतेज पाटील यांना त्यांचे कट्टर राजकीय वैर असलेल्या धनंजय महाडिक यांच्याशी वादावर थेट प्रश्न विचारत बोलते करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाटील यांनी पहिल्यांदाच नेमका वाद काय आहे याबद्दल सांगितलं. तसेच पार्श्वभूमी सांगितली. 


यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्याशी नेमका कोणता वाद आहे यावरती भाष्य केलं. त्यांनी बोलताना 2004 पासून संदर्भ असल्याचे सांगत हा वाद राजकीय असल्याचे सांगितले. यामध्ये कोणताही वैयक्तिक वाद नाही. राजकीय भूमिका न पटल्याने हा वाद होत गेल्याचे  पाटील यांनी यावेळी नमूद केले. 


सतेज पाटील काय म्हणाले? 


ते म्हणाले की, वाद आहे तो अनेक निवडणुकीचा आहे. तो इतिहास 2009, 2014, 2019 मधील आहे. अशा अनेक निवडणुकीचा इतिहास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहिला आहे. आणि म्हणून आम्ही काँग्रेस म्हणून एका विचाराने आम्ही लढाई करत आहोत. तो त्यांचा पक्ष आहे तो त्यांचा अजेंडा पुढे नेत आहेत. आम्ही आमच्या पक्ष म्हणून आमचा विकासाचा अजेंडा कोल्हापूरमध्ये नेण्याचा प्रयत्न करत आहोत. 



सातत्याने बदलत राहणं हे लोकांना पटत नाही


ते पुढे म्हणाले की, पूर्वी 2004 ला आम्ही एकत्रच होतो. परंतु शेवटी राजकारणामध्ये कधी कधी वाटा वेगवेगळ्या होत असतात. ते कारण मी जाहीरपणे सांगू शकत नाही. वाटा वेगळ्या झाल्यानंतर माझी भूमिकेला अनुसरून मी पुढे जात आहे. कारण सातत्याने बदलत राहणं हे लोकांना पटत नाही. म्हणून मी घेतलेल्या भूमिकेला अनुसरून समाजकारण, राजकारण करण्याचा प्रयत्न करतो. 


महाडिक यांच्याशी कोणताही वैयक्तिक वाद नाही


तेव्हा आमच्याकडे बुलेट, यामाहा आणि सायकल सुद्धा होती. आम्ही सायकलवरून त्या काळात कागलपर्यंत क्रिकेटच्या सामन्यांसाठी गेल्याची आठवण सतेज पाटील यांनी सांगितली. महाडिक यांच्याशी कोणताही वैयक्तिक वाद नाही. राजकीय भूमिका न पटल्याने पुढे वाद होत गेल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या