मुंबई : ईडीत्रस्त असलेल्या हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी अजित पवार गटात सामील होत मंत्रीपद मिळवलं असलं, तरी त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी (Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory Money Laundering Case) विशेष पीएमएलए कोर्टानं निरीक्षण नोंदवताना अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. हसन मुश्रीफांपोठोपाठ ऑडिटर महेश गुरवचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. महेश गुरव हे मुश्रीफांचे सीए आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे, हसन मुश्रीफ यांची अटकपूर्व जामीन याचिका सध्या हायकोर्टात प्रलंबित असल्यानं तूर्तास अटकेपासून दिलासा मिळाला आहे.
हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी मिळून कट रचला
विशेष पीएमएलए कोर्टानं अत्यंत कडक शब्दात मुश्रीफांसह त्यांच्या तीन मुलांवर ताशेर ओढले आहेत. मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी मिळून कट रचला आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली असं प्रथमिकदृष्ट्या स्पष्ट होत असल्याचे विशेष पीएमएलए कोर्टाचं निरीक्षण नोंदवलं आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि महेश गुरव यांची याचिका फेटाळल्यानं अटकपूर्व जामीनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुश्रीफांच्या तिन्ही मुलांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसरीकडे, हसन मुश्रीफांची अटकपूर्व जामीन याचिका सध्या हायकोर्टात प्रलंबित असल्यानं तूर्तास अटकेपासून दिलासा मिळाला आहे.
ईडीकडून मुश्रीफांविरोधात 35 कोटींचा मनी लाँड्रिंगचा गुन्हा
दुसरीकडे, ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने मुश्रीफ यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांची सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्जपुरवठा प्रकरणात चौकशी सुरु आहे. त्यामुळे शरद पवार यांनीही पक्ष फुटल्यानंतर ईडीच्या रडारवर असलेल्या नेत्यांची यादी वाचताना दोन नंबरला हसन मुश्रीफ यांचा उल्लेख केला होता.
ईडीकडून मुश्रीफांविरोधात 35 कोटींचा मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर तीनवेळा ईडीकडून छापेमारी झाली आहे. ईडीकडून करण्यात येत असलेले सर्व दावे हसन मुश्रीफ यांच्याकडून फेटाळून लावण्यात आले आहेत. त्यांच्या तिन्ही मुलांमागेही ईडीचा ससेमीरा सुरु आहे. मुश्रीफांविरोधात कोल्हापूर आणि मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कोल्हापूरमध्ये त्यांच्या विरोधात शंभराहून अधिक तक्रारी दाखल झाल्या असून या प्रकरणांचा तपास कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या