कोल्हापूर : शरद पवार (Sharad Pawar) यांची बाजू भक्कमच आहे, त्यात शंका घेण्याचं कारण काय? दुसरी बाजू त्यांच्या मताप्रमाणे दावा करणारच. मात्र, पक्ष पक्षाच्या ठिकाणी आहे. आमदार गेले म्हणून पक्ष त्यांच्या पाठीमागून जात नाही, असं सुप्रीम कोर्टानेच शिवसेनेच्या बाबतीत भाष्य केलं आहे. देशातील पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र करून दिलं आहे ज्यामध्ये शरद पवार यांनाच अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली. पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर (Kolhapur News) होते. यावेळी राष्ट्रवीमध्ये सुरु असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.   


शरद पवारांच्या 25 वर्षाच्या नेतृत्वामुळे आम्हा सर्वांना सत्तेत बसण्याची संधी मिळालेली आहे. गेली 17 18 वर्षे सगळेजण जवळपास हे मंत्री राहिलेले आहेत. त्यावेळी शरद पवार साहेबांची कृती त्यांना अडचणीची वाटली नाही. आज त्यांची अडचण निर्माण झाली म्हणून सगळा दोष शरद पवारांवर देऊन त्यांचा पक्ष काढून घेण्याचा जो प्रकार आहे तो भारतातील जनता मान्य करेल असं वाटत नाही, असेही ते म्हणाले.


नवाब मलिकही अजित पवार गटाच्या गळाला? 


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिकही अजित पवार गटाच्या गळाला लागल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर विचारले असता, जयंत पाटील यांनी (Jayant Patil on Nawab Malik) तीन वाक्यात उत्तर देत सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, नवाब मलिक यांना बाहेर बोलण्यास कोर्टाने मज्जाव केला आहे. त्यामुळे ते असं कुठेही बोलले नाहीत. नवाब मलिक अजित पवार गटासोबत जात आहेत असं प्रसारमाध्यमांमधून मीच ऐकलं आहे. 


विजय वडेट्टीवारांच्या दाव्यावर काय म्हणाले.. 


विजय वडेट्टीवारांनी केलेल्या दाव्यावर ते म्हणाले की, त्या नऊ भ्रष्टमंत्र्यांची नावे विजय वडेट्टीवार यांच्याकडे असतील ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि ते योग्य वेळी सभागृहात त्यांची नावे सांगतील



 


नांदेडची घटना अत्यंत गंभीर 


जयंत पाटील यांनी सांगितले की, नांदेडची घटना अत्यंत गंभीर आहे आणि औषध खरेदी करण्याचा निर्णय या सरकारमधील मंत्र्यांना घेतला तोच निर्णय या गोष्टीला कारणीभूत आहे. नाहीतर नांदेड ची घटना घडलीच नसती. आमच्या सरकारच्या काळात विकेंद्रीत खरेदी करण्याची व्यवस्था होती. मात्र, या सरकारच्या काळात संबंधित मंत्रांनी स्वतःकडे अधिकार घेतले आहेत. महत्त्वाचे निर्णय योग्य वेळेस झालेले नसतील, औषधांचा तुटवडा संपूर्ण महाराष्ट्रात जाणवला असेल त्यामुळे मंत्रीच यास जबाबदार असतील, जर मंत्रीच असं म्हणत असतील की मंत्री जबाबदार आहेत तर हे सगळे या गोष्टीला जबाबदार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या