Kolhapur Municipal Corporation : राज्यातील अनेक शहरांमध्ये सद्या गोवरचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचे मार्गदर्शनात शहरात घरोघरी सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. या अंतर्गत शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे दिनांक 15 ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत पहिल्या टप्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा आजपासून प्रारंभ होणार आहे. दुसरा टप्पा 15 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.


गोवर विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळयाची जळजळ, चेहऱ्यावरील आणि शरीरावर लाल सपाट पुरळ अशी गोवरची लक्षणे आहेत. रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर गोवरची लक्षणे दिसून येतात. गोवर हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. या आजाराची लक्षणे आढळलेस घाबरुन न जाता महानगरपालिकेच्या नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला अथवा महानगरपालिकेच्या रुग्णालयाला भेट द्यावी. प्रशासक यांनी सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्क राहून अधिक गतीमानाने कृतीशील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. (Kolhapur Municipal Corporation)


मोहिम कालावधीमध्ये लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांना लसीकरण करणेत येणार आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये गोवर रुबेलाचे कामकाज सुरु असून नोव्हेंबर अखेर 6932 एवढ्या मुलांना पहिला डोस व 6868 मुलांना दुसरा डोस देणेत आला आहे. गोवर रुबेला लसीकरणाबरोबरच व्हिटॅमिन अ जीवनसत्वाचा डोस देणेत येणार आहे. यामध्ये 9 महिने ते 12 महिने वयोगटातील मुलांना पहिला डोस आणि 16 ते 24 महिने वयोगटातील मुलांना दुसरा डोस देणेत येणार आहे. गोवर रुबेला लसीकरण 26 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करणेचे नियोजन आहे. 


महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 9 महिने ते 5 वर्षे ज्या मुलांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही अशा वंचित मुलांसाठी दोन टप्प्यामध्ये गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. शहरातील 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना गोवर रुबेला उद्रेकापासून बचाव करणेसाठी ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना गोवर रुबेलाचा पहिला व दुसरा डोस व  व्हिटॅमिन-अ चा डोस दिला नसेल अशा पात्र लाभार्थ्यांनी दिनांक 15 ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत नजिकच्या महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.