Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District Assembly Constituency) राधानगरी (Radhanagari) कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) आणि शिरोळ (Shirol) या तीन मतदारसंघांवरून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच जुंपली आहे. कोल्हापूर उत्तरच्या जागेसाठी ठाकरे गटाचा दावा कायम आहे, तर कोणत्याही परिस्थितीत ही जागा आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसकडून सुद्धा शड्डू ठोकण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर आणि राधानगरीचा तिढा कधी सुटणार? याचीच चर्चा कोल्हापूरमध्ये रंगली आहे. राधानगरीमध्ये माजी आमदार के पी पाटील आणि ए वाय पाटील यांच्यामध्ये चुरस असून दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष आहे, तर कोल्हापूर उत्तरमध्ये विद्यमान आमदार जयश्री जाधव या असून सुद्धा त्यांच्या उमेदवारीची चर्चा कुठेही होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या बदली काँग्रेसचा कोण उमेदवार असणार याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. 


मधुरिमाराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून जोरदार पोस्टरबाजी


या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर उत्तर मधून माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमाराजे छत्रपती यांना संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यांची संभाव्य उमेदवारांमध्ये चर्चा होत आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीबाबत अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही. मात्र मधुरिमाराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियामध्ये जोरदार पोस्टरबाजी करण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित झाली आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान सोशल मीडियामध्ये पोस्टरबाजी सुरू झाल्यानंतर मालोजीराजे छत्रपती यांच्याकडून समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 


कोण आहेत मधुरीमाराजे छत्रपती?



  • माजी आरोग्यराज्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या 

  • माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी 

  • मालोजीराजे छत्रपती हे 2004 मध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार 

  • खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासूनबाई

  • लहानपणापासूनच घरातून मिळाले राजकारणाचे धडे 

  • राजकारणाबरोबरच सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात कामगिरी 

  • महिलांचं संघटन ही जमेची बाजू 

  • लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारात आघाडीवर


कोल्हापूर उत्तरवर भाजपकडूनही दावा


दुसरीकडे कोल्हापूर उत्तरमध्ये 2022 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी विजय मिळवला होता. मात्र भाजपच्या उमेदवाराला तब्बल 80 हजाराच्या घरात मते मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपकडून सुद्धा दावा करण्यात आला आहे. भाजपकडून सत्यजित कदम, महेश जाधव, अजित ठाणेकर यांनी उमेदवारी उमेदवारी मागितली आहे. खासदार धनंज महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक सुद्धा इच्छूक आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर उत्तरचा दावा सोडलेला नाही. त्यामुळे ही जागा शिंदे गटालाच सुटण्याची चर्चा आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर दक्षिण आणि इचलकरंजी हे दोनच मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये शिंदे गट वरचढ राहण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिंदे गटाकडे कोल्हापूर उत्तर, राधानगरी, शिरोळ आणि करवीर हे मतदार संघ येण्याची शक्यता आहे.


इतर महत्वाच्या बातम्या