Maharashtra Politics Sanjay Mandlik : एकनाथ शिंदे गटाविरोधात रस्त्यावर उतरणारे शिवसेनेचे पहिले खासदार संजय मंडलिक हे देखील एकनाथ शिंदे गटाच्या मार्गावर असल्याचे वृत्त आहे. खासदार संजय मंडलिक हे कोल्हापूरचे खासदार आहेत. संजय मंडलिक यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात कार्यकर्ते शिंदे गटात जाण्याचा आग्रह धरू शकतात. याच आग्रहाचे कारण देत आपण शिंदे गटात जात असल्याचे खासदार मंडलिक शिंदे गटात जाणार असल्याची दाट शक्यता आहे. खासदार धैर्यशील मानेदेखील उद्धव ठाकरे यांना 'जय महाराष्ट्र' करू शकतात, असे म्हटले जात आहे. 


काही दिवसांपूर्वी खासदार मंडलिक यांनी शिवसेनेतून गेले ते बेन्टेक्स होतं, आता राहिलेले अस्सल सोनंच असं वक्तव्य त्यांनी केले होते. जवळपास तीन वर्षांपूर्वी संजय मंडलिक यांनी  कोल्हापूरमधून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे दोन खासदार आहेत. या दोन्ही खासदारांनी पक्ष सोडणार नसल्याचे म्हटले होते. खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज दुपारी कागल तालुक्यातील हमीदवाडा येथे आयोजित करण्यात आला आहे. 


कोल्हापूरमधून राजेंद्र पाटील,  आमदार प्रकाश आबिटकर आणि  शिवसेनेचे नेते नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर मंडलिक आणि माने या दोन्ही खासदारांनी उद्धव ठाकरे यांना साथ देणार असल्याचे स्पष्ट केले होते. 


बैठकांना दांडी


राष्ट्रपती निवडणुकीसाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीसाठी संजय मंडलिक अनुपस्थित होते. मात्र, आपण पूर्वपरवानगीने हजर होतो असेही त्यांनी सांगितले. तर, धैर्यशील माने यांनी मातोश्रीवरील बैठकीत हजेरी लावली. तर, कोल्हापुरात झालेल्या शिवसेना मेळाव्यात अनुपस्थित राहिले होते. त्यानंतर या दोन्ही खासदारांबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. 


संजय मंडलिक शिंदे गटात गेल्यास शिंदे गट आणि भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळू शकते. धनंजय महाडिक हे सध्या भाजपकडून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे. त्याशिवाय त्यांना इतरांकडून मोठी साथ मिळू शकते.