Maharashtra Kolhapur weather Update : गेल्या तीन वर्षांपासून सलग महापूराच्या यातना सहन करत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यावर (Kolhapur Rain Update) यंदाही महापुराची टांगती तलवार आहे. हवामान खात्याने दिलेल्या दुसऱ्या अंदाजानुसार जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 106 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस कोसळणार आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही सरासरीच्या 103 टक्के पाऊस होणार आहे. हवामान विभागाने काल अंदाज जाहीर केले आहेत. 


मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर हवामान विभागाकडून पावसाचा दुसरा अंदाज जाहीर करण्यात आला. हवामान विभागाकडून यापूर्वी एप्रिल महिन्यात 14 तारखेला अंदाज जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, देशात सरासरीच्या तुलनेत 103 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. माजी हवामान विभाग प्रमुख माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक,औरंगाबाद, लातूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 106 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. 


संभाव्य पुरस्थितीमुळे 15 जूनपासून एनडीआरएफ पथक तैनात करण्याचे आदेश 


गेल्या तीन महापुराचा कटू अनुभव लक्षात घेऊन प्रशासन अलर्टवर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या 15 जूनपासून एनडीआरएफ पथके तैनात करण्याचे आदेश  थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईत झालेल्या मान्सूनपूर्व आढाव बैठकीनंतर हे आदेश दिले. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील पुरात बचावकार्यासाठी कोल्हापूरमधील (Kolhapur Rain Update) विस्तारित धावपट्टी तसेच नाईट लँडिंग सुविधा सुरु करा, असा प्रस्ताव पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे. त्यावर निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


मान्सून  महाराष्ट्राच्या वेशीवर


दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून कोकण आणि गोव्यामध्ये पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दोन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने मान्सून केरळच्या किनारपट्टीवर  दाखल झाल्यानंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. 


अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी


राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. काल नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस बरसला. नांदेड शहरातील सिडको परिसरात वादळी वाऱ्यामुळे रिक्षावर झाड कोसळले. हिंगोलीत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्यानं उकाड्याने त्रस्त असणाऱ्या हिंगोलीकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.. तर पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोलापूरच्या बार्शी शहर आणि परिसरातही तुफान वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. यवतमाळमध्ये विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह काल जोरदार ऊस झाला.