कोल्हापूर: कोल्हापुरात (Kolhapur News) सध्या श्री कोल्हापूर महालक्ष्मी महाउत्सव नावाचे होर्डिंग्स झळकत आहेत. या होर्डिंगवर विविध आजारांवर दिव्य मंत्रांनी दैविक प्रार्थना करण्यात येणार असल्याचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे. याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतलेला आहे.
26 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान कोल्हापुरात महालक्ष्मी महाउत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री कृष्णगिरी पार्श्व पद्मावती सेवा ट्रस्ट महाराष्ट्र शाखा यांच्या वतीने हा महाउत्सव आयोजित केला आहे. मात्र हा महाउत्सव आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मंत्रोच्चाराने विविध आजारांवर उपचार करण्याचा दावा या होर्डिंगवर करण्यात आल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली आहे.
दरम्यान, होर्डिंग्जवर श्री कोल्हापूर महालक्ष्मी असा उल्लेख केल्यामुळे अनेक भाविक कोल्हापुरातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संपर्क करून या कार्यक्रमाची माहिती विचारत आहेत. मात्र या कार्यक्रमाचा अंबाबाई मंदिर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा कोणताही संबंध नाही. केवळ नावात साम्यता ठेवून अशा पद्धतीच्या इतर संस्था हे कार्यक्रम करत असल्याचं सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले आहे. देवस्थान समितीकडून सांगण्यात आले. इतकच नाही तर संबंधितांवर देवस्थान समितीच्या विधीज्ञांशी बोलून कायदेशीर कारवाईबाबत देखील विचार असल्याचं सांगण्यात आलंय.
श्री महालक्ष्मी कोल्हापूर महाउत्सव या कार्यक्रमावर कोल्हापूर महानगरपालिकेने आक्षेप घेतला आहे. या कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये मंत्रोच्चाराच्या सहाय्याने आजार बरे केले जातील, असे दाखवण्यात आले. ही शास्त्रीय पद्धत नसून यामुळे चुकीच्या गोष्टी समाजामध्ये पसरू शकतात. कार्यक्रमाची परवानगी घेत असताना अशा पद्धतीचे कोणतेही कागदपत्रे जमा केली नाहीत. त्यामुळे आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमावर कारवाई होण्याची शक्यता आहे, असा इशारा कोल्हापूर महानगरपालिकेने दिला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील याबाबत आक्षेप नोंदवला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे अनेक भाविक या महाउत्सवाबाबत विचारणा करत आहेत. मात्र या कार्यक्रमाचा आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा कोणताही संबंध नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Kolhapur News : कोल्हापुरातील महालक्ष्मी महाउत्सवची चौकशी होणार; मनपा प्रशासनाकडून गंभीर दखल