Chandrakant Patil : पुण्यातील कसबा मतदारसंघात प्रचारामध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपहासात्मक who is धंगेकर? अशी विचारणा केली होती. यानंतर विरोधकांकडून धंगेकर निवडून आल्यानंतर पुण्यापासून ते पार कोल्हापूरपर्यंत डिवचण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील विरोधकांवर पुन्हा कडाडले आहेत. त्यांनी कोल्हापुरातून (Kolhapur News) विरोधकांच्या होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला. 


मला समजून घेण्यास तुम्हाला खूप जन्म घ्यावे लागतील


चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले, की विरोधकांनो मला समजून घेण्यास तुम्हाला खूप जन्म घ्यावे लागतील. मी कोठून पैसे आणतो, याचा शोध घेण्यापेक्षा लोकांची कामे करा. माझ्याकडून काही शिकायचं असल्यास लोकांच्या मदतीला धावून जा. त्यातून मते मिळतील की नाही हे मलाही माहित नाही. पुण्य मात्र नक्की मिळेल. विरोधकांना माझ्यावर टीका करून प्रसिद्धी मिळणार असेल, तर त्यांनीही ती करावी असा टोलाही त्यांनी लगावला. 


भाजपकडून आयोजित मोफत फिरता दवाखाना रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कोल्हापुरातील दौलतनगरातील तीन बत्ती चौकात हा कार्यक्रम पार पडला. मंत्री पाटील यावेळी म्हणाले की, लोकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे काम सुरू आहे. आरोग्य विषयक सेवा लोकांना उपलब्ध करणे आवश्यक आहे. राजकारण बाजूला ठेवून हातात हात घालून करण्याचे हे काम आहे. पुण्यातही हा  उपक्रम सुरु केला. दिवसभरात 171 जणांनी उपचार करून घेतले. फिरता दवाखान्यात केसपेपर केला जात नाही की औषधाचे पैसे घेतले जात नाहीत. 


हिंमत असेल तर राऊत यांनी राजीनामा द्यावा 


दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजय राऊत यांनाही टोला लगावला. ते म्हणाले की, दादा हवा जोरात आहे. तुमची टोपी उडेल असे म्हणणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या टोपीची काळजी करावी. ज्या आमदारांच्या जीवावर ते मोठे झाले आहेत, ते बाहेर पडले आहेत. हिंमत असेल तर राऊत यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा राज्यसभेवर निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. देशात बदलाचे चित्र असे म्हणणारे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत, असा टोलाही त्यांनी शरदर पवार यांना लगावला.


विरोधक हैराण झाले आहेत 


ते पुढे म्हणाले की, संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. शिव्याशाप देत आहेत. त्यांना मी एन्जॉय करतो. त्यांनी हिंमत असेल तर राजीनामा द्यावा. कसब्यातील निवडणुकीबाबत मी दोन दिवसांत विश्‍लेषण करणार आहे. माझ्यावर शाईफेक झाली, तरी मी परत आलो. यामुळे विरोधक हैराण झाले आहेत. माझी कोंडी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तरीही मी त्यांना सापडत नाही. ‘सॉफ्ट टार्गेट’ असल्याने कसब्यातील पराभवाचे फ्लेक्स कोल्हापुरात उभारले गेले. 


इतर महत्वाच्या बातम्या