Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भुभागावर दावा केल्यानंतर सीमाप्रश्न पेटला आहे. चिथावणीखोर वक्तव्ये आणि दंडूकेशाही कर्नाटककडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानंतरही सुरु असल्याचे आजच्या कृतीवरून सिद्ध झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होईल, अशी कोणतीही कृती किंवा वक्तव्ये करू नयेत, असे स्पष्ट निर्देश अमित शहांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले होते. मात्र, आज बेळगावमध्ये तसेच कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांची दंडूकेशाही दिसून आली. कोगनोळी टोलनाक्यावर लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांच्यावरही पोलिसांकडून लाठी उगारण्यात आली. त्यामुळे या दंडूकेशाहीचे (Maharashtra Karnataka Border Dispute )करायचं तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


बेळगावमधील मराठी भाषिकांची होणारी गळचेपी रोखण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी मराठी भाषिक करत आहेत. दरम्यान, कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महामेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा मेळावा होऊच नये आणि महाराष्ट्रातील नेतेही या मेळाव्यासाठी पोहोचू नयेत, यासाठीच कर्नाटक पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले. बेळगावमध्ये पोलिसांकडून कलम 144 आणि जमावबंदी लागू करण्यात आली होती. 


Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटक पोलिसांकडून घुमजाव 


बेळगावमधील व्हॅक्सिन डेपो मैदानावर आयोजित मराठी भाषिकांच्या मेळाव्यास परवानगी देण्यात येईल आणि त्यासाठी सुरक्षा देखील पुरवण्यात येईल असं कानडी पोलिस अधिकारी कालपासून सांगत होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून मेळाव्यासाठी स्टेज उभारणीचे काम सकाळी सुरु करण्यात आलं होतं. तथापि, कर्नाटक पोलिसांकडून घुमजाव करण्यात आले. बेळगावमधे कलम 144 लागू केल्याच सांगत कर्नाटक पोलिसांकडून मेळाव्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर मराठी भाषिकांची धरपकड करण्यात आली. जे कोणी कार्यकर्ते मेळाव्याच्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करत होते त्यांना कर्नाटक पोलिस ताब्यात घेण्यात आले. 


Maharashtra Karnataka Border Dispute : एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना डांबून ठेवले 


महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना आज कर्नाटक पोलीसांनी डांबून ठेवलं होते. मराठी भाषिकांचा मेळावा होऊ न देण्यासाठी ही दडपशाही करण्यात आली होती. संध्याकाळी या नेत्यांना सोडून देण्यात आलं. त्यानंतर या नेत्यांनी आता, तरी महाराष्ट्राने सीमाप्रश्न सोडवण्यासाठी दबाव निर्माण करावा नाही, तर आम्हाला कर्नाटकातच रहा, इकडे येऊ नका असं सांगावं असं त्रागा व्यक्त केला. 


Maharashtra Karnataka Border Dispute : कोगनोळी टोलनाक्यावर आंदोलन 


एकीकरण समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना सुद्दा बंदी घालण्यात आली होती. मात्र, कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे नेते बेळगावला जाण्यावर ठाम होते. कर्नाटक पोलिसांनी कोल्हापुरातील नेते बेळगावला पोहोचू नयेत, यासाठी हजारो पोलिस तैनात केले होते. यावेळी पोलिसांचा विरोध झुगारून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाण्याचा प्रवेश केला. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर लाठी उगारण्यात आली. 


Maharashtra Karnataka Border Dispute : बोम्मईंनी आदेश धुडकावला


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्न धुमसत आहे. वाहनांवर होणारे हल्ले, एकमेकांच्या प्रदेशांवर केले जाणारे दावे यामुळे सीमावाद वाढत चालला आहे. ही परिस्थिती निवळावी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत एकत्र बैठक घेतली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत एकमेकांच्या प्रदेशांवर दावा करायचा नाही असं ठरलं होतं. त्याचबरोबर एकमेकांच्या नेत्यांना एकमेकांच्या राज्यात येऊ देण्यास मनाई करायची नाही असही ठरलं होतं, पण आज कर्नाटक सरकारने या तहाला पुर्णपणे धाब्यावर बसवून मराठी भाषिकांची गळचेपी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या