Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी अत्यंत चुरशीने आणि कमालीच्या ईर्ष्येने रविवारी मतदान पार पडले. मतमोजणी उद्या मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. थेट सरपंच निवडणुकीमुळेही मोठी उत्सुकता आहे. राजकीय पक्षांनी थेट ताकद न लावता ताकदीच्या उमेदवाराला सर्वच मार्गांनी रसद पुरवल्याने थेट सरपंचपदाची निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 475 ग्रामपंचायतींसाठी (Kolhapur District Gram Panchayat Election) निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. मात्र, 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्ष 429 गावगाड्यांवरील कारभारी ठरवण्यासाठी रविवारी मतदान पार पडले. शाहूवाडी तालुक्याला नगरपंचयातीचा दर्जा मिळावा यासाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे शाहूवाडी या तालुक्याच्या गावी मतदान झाले नाही. 


करवीर तालुक्यातील निकालाची उत्सुकता


दरम्यान, करवीर (Kolhapur District Gram Panchayat Election) तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींसाठी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. अतिसंवेदनशील गावांमध्ये पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, किरकोळ वादाचे प्रसंग काही ठिकाणी घडले. करवीर तालुक्यात 282 मतदान केंद्रांवर 78 हजार 433 महिला, तर 86 हजार 270 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. इतर 8 जणांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात 1 लाख 64 हजार 711 जणांनी मतदान केले. एकूण 82.33 टक्के मतदानाची नोंद झाली. 


शहराच्या वेशीवरील गावांमधील निकालाची उत्सुकता


कोल्हापूर शहराच्या वेशीवरील गावांमध्ये निवडणूक होत असल्याने उत्सुकता आहे. वडणगे, पाचगाव, उचगाव, कळंबा, मोरेवाडी या ग्रामपंचायतींमध्ये थेट महाडिक (Dhananjay Mahadik) आणि सतेज पाटील (Satej Patil) गटात स्पर्धा असल्याने कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. पाचगावमध्ये 66 टक्के मतदान झाले. पाचगावमध्ये महाडिक आणि पाटील गटात थेट स्पर्धा आहे. अपक्षांनी सुद्धा मोठी ताकद लावली असल्याने डोकेदुखी कोणाला होणार हे निकालानंतर समजेल. (Kolhapur District Gram Panchayat Election)


पाचगाव, कंदलगाव व मोरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये थेट दोन गटांमध्ये सामना होत असून अपक्षही रिंगणात आहेत. पाचगावमध्ये सरपंचपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित आहे. सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. पाचगावमध्ये एकूण वॉर्ड 6 असून 17 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. सरपंचपदासाठी प्रियांका संग्राम पाटील, सुवर्णा भिकाजी गाडगीळ, भारती संतोष ओतारी, मिनाक्षी महेश डोंगरसाने रिंगणात आहेत. या ठिकाणी महाडिक, पाटील गटात चुरस आहे. कंदलगावमध्येही याच दोन गटात सामना आहे. मोरेवाडीतही पाटील व महाडिक गटात चुरस आहे. 


कळंब्यात 80.14 टक्के, उचगावमध्ये 73 टक्के मतदान 


कळंबा ग्रामपंचयतीमधील 13 जागांसाठी चुरशीने 80.14 टक्के मतदान झाले. या ठिकाणी चार जागा आणि सतेज पाटील गटाचा सरपंच बिनविरोध झाला आहे. दुसरीकडे उचगावमध्ये 73 टक्के मतदान झाले आहे. या दोन्ही गावांमध्येही कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे. कळंब्यात महाडिक गटाला सरपंचपदासाठी उमेदवारच मिळाला नव्हता. 


शिरोलीत काय होणार?


दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या गामपंचायत असलेल्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली ग्रामपंचायतीसाठी सत्ताधारी शाहू स्वाभिमानी आघाडी विरुद्ध महाडिक आघाडी अशी थेट दुरंगी लढत होत आहे. शिरोलीत चुरशीने 80 टक्के मतदान झालं आहे. सरपंचपदासाठी शाहू आघाडीकडून माजी ग्रामपंचायत सदस्य रूपाली खवरे आणि महाडिक आघाडीकडून पद्मजा करपे रिंगणात आहेत. सत्तेत परतण्यासाठी महाडिक आघाडीने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शिरोली ग्रामपंचायतीमध्ये 17 सदस्य आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या