कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांना निवडणुकीच्या आधीच मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे (Madhurima Raje) यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसकडे उमेदवारच राहिला नाही. त्यानंतर मात्र सतेज पाटील हे चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. 'दम नव्हता तर उभारायचं नव्हतं  ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद' असं म्हणत सतेज पाटलांनी त्यांचा राग व्यक्त केला. यामुळे कोल्हापूरमध्ये मोठं नाराजीनाट्य दिसून आले. 


आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे कोल्हापुरात दाखल झाले. के पी पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. या सभेत काँग्रेस नेते सतेज पाटील उपस्थित होते. काल कोल्हापूरमध्ये घडलेल्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सतेज पाटील यांनी आपल्या जवळ बोलावले. सतेज पाटील उद्धव ठाकरेंच्या जवळ जाताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांच्यावर राधानगरी विधानसभा मतदारसंघातून के पी पाटील यांच्या विजयाची जबाबदारी देखील सोपवली.   


विजयाची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर : उद्धव ठाकरे


उद्धव ठाकरे म्हणाले की,  आताची लढाई महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी आहे. आज मी साथ मागायला आलो आहे. तुम्ही माझ्यासोबत लढायला तयार आहात का? प्रचाराचा नारळ आई अंबाबाईचे दर्शन घेऊन करतो. बाळूमामा यांचं दर्शन घेऊन तुमचे दर्शन घेतोय. राधानगरीची जनता गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही. मी उमेदवारी दिली, मान सन्मान दिला, प्रेम दिले. सगळं देऊन शिवसेनेसारख्या आईवर वार कसा काय करू शकतो? सतेज पाटील सोबत आहेत हे मला आणखी बरं वाटलं. इथल्या विजयाची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर टाकतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 


उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका


उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्यासाठी यांना सरकार पाहिजे. तुम्हाला मोदी-शाह यांचा महाराष्ट्र तुम्हाला मान्य आहे का? की छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र पाहिजे. तीन-तीन भाऊ आले आहेत. एका बाजूला देवा भाऊ दुसरीकडे दाढी भाऊ, तिसरीकडे जॅकेट भाऊ. भाऊ-भाऊ आणि मिळून खाऊ, अशी टीका त्यांनी महायुतीवर केली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?


सतेज पाटलांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान केला, निवडणूक आयोगाने कडक कारवाई करावी, केशव उपाध्याय यांची टीका