कोल्हापूर :  कोल्हापूर उत्तरचे अपक्ष उमेदवार राजेश लाटकर उद्धव ठाकरेंची भेट घेणारआहेत.   विधानसभा निवडणुकीत पाठिंबा द्यावा यासाठी भेट घेणार असल्याची माहीती आहे.अपक्ष उमेदवार राजू लाटकर यांना प्रेशर कुकर हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे.दरम्यान आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी लाटकर सतेज पाटलांची  भेट घेणार आहेत.  कोल्हापुुरात काँग्रेसवर दोनदा उमेदवार बदल्याची नामुष्की ओढावली. मधुरिमाराजेंची उमेदवारी मागे घेतल्याने काँग्रेस कोल्हापूर उत्तरमध्ये आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार  आहे.


मी काँग्रेसी विचारांचा कार्यकर्ता आहे. बंटी पाटील माझे नेते होते, आहे आणि राहणार आहेत, अशा शब्दांत लाटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  शाहू महाराज यांनी मला न्याय देण्याचा प्रयत्न केला मी त्यांचा आभारी आहे. सतेज पाटील हे माझे काल देखील नेते होते आज देखील नेते आहेत आणि उद्या देखील नेते राहतील. मला काँग्रेसच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी त्यांना भेटणार आहे.अशा पद्धतीची प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.


मधुरीमाराजे यांनी अर्ज कधी मागे घेतला?


कोल्हापूर उत्तरमधील वादाला खऱ्या अर्थाने सुरुवात राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करण्यावरून झाली.  राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करावी यासाठी अनेक माजी नगरसेवकांनी सतेज पाटील यांना पत्र लिहिले. यानंतर ही उमेदवारीची माळ मधुरिमा राजे यांच्या गळ्यात पडली. मात्र त्यामुळे राजेश लाटकर यांना सहानुभूती मिळत राहिली. राजेश लाटकर यांची वोट बँक चांगली आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी स्वतः शाहू महाराज मालोजी राजे आणि मधुरिमा राजे  लाटकर यांच्या घरी पोहोचले.  त्यावेळी लाटकर यांनी माझ्यावर अन्याय का केला अशा पद्धतीची विचारणा केली. शेवटी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या काही मिनिटे आधी लाटकर उमेदवारी अर्ज मागे घेतात का त्याची प्रतीक्षा केली. मात्र लाटकर यांचा फोन स्विच ऑफ होता. अखेर कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी मधुरीमाराजे यांची उमेदवारी मागे घ्यायला भाग पाडलं. 


दोन ते अडीच महिन्यांपूर्वी काय घडले?


कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मधुरिमाराजेंनी लढावं यासाठी सतेज पाटलांनी दोन ते अडीच महिन्यांपूर्वीच विनंती केली होती.पण त्यावेळी ही ऑफर शाहू महाराजांनी नम्रपणे नाकारली होती..एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी नको अशी शाहू महाराजांची भूमिका होती.त्यानंतर सतेज पाटलांनी राजेश लाटकर यांच्या नावाची पक्षाकडे शिफारस केली. काँग्रेसच्या दिल्लीतून प्रसिद्ध झालेल्या यादीत राजेश लाटकर यांचं नावही आलं. त्यानंतर मधुरिमाराजे आणि मालोजीराजेंनी ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली काही नगरसेवकांनीही राजेश लाटकरांची उमेदवारी बदलावी यासाठी सतेज पाटलांना पत्र लिहिलं.सतेज पाटलांनी पुन्हा एकदा पक्षाकडे उमेदवार बदलण्याची शिफारस केली..पक्षानंही राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करुन मधुरिमाराजेंना तिकीट जाहीर केलं..त्यानंतर नाराज झालेल्या राजेश लाटकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.


राजेश लाटकर यांची समजूत काढण्यासाठी खुद्द शाहू महाराज घरी गेले


राजेश लाटकर यांची समजूत काढण्यासाठी खुद्द शाहू महाराज त्यांच्या घरीही गेले होते..पण राजेश लाटकर निवडणूक लढण्यावर ठाम होते.  अखेर मधुरिमाराजेंनीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. सतेज पाटलांच्या शिफारशीनुसारच काँग्रेसनं राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर सतेज पाटलांच्या शिफारशीनुसारच लाटकरांची उमेदवारी बदलून मधुरिमाराजेंना तिकीट देण्यात आलं.त्याच मधुरिमाराजेंनी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेतल.  कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून आता काँग्रेसचं पंजा हे चिन्हही गायब झालंय. मधुरिमाराजेंच्या माघारीमुळं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपुढे आपल्याला तोंडघशी पाडलं गेलं अशी भावना सतेज पाटलांची झालीय.


मधुरिमाराजेंचा नेमका कोणता नाईलाज होता?


काँग्रेसनं आता अपक्ष उमेदवार असलेल्या राजेश लाटकर यांना पाठिंबा दिलाय. ज्या लाटकरांचं तिकिट काँग्रेसनं रद्द केलं.. त्याच लाटकरांना समर्थन देण्याची वेळ काँग्रेसवर आली.मधुरिमाराजेंनी नाईलाजानं माघार घेतल्याचं शाहू महाराज सांगतात. पण मधुरिमाराजेंचा नेमका कोणता नाईलाज होता? राजेश लाटकरांची बंडखोरी...मतदारांचा संभाव्य कौलकी दुसरंच काही कारण?
या प्रश्नाचं योग्य उत्तर फक्त मधुरिमाराजे, मालोजीराजे आणि शाहू महाराजच देऊ शकतील.




हे ही वाचा :


Satej Patil : शाहू महाराजांचा हस्तक्षेप अन् शेवटच्या क्षणी मधुरिमाराजेंची माघार; कोल्हापूर उत्तरमध्ये सतेज पाटील तोंडघशी पडले?