Lumpy Skin Disease : कोल्हापूर जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा विळखा वाढतच चालला आहे. जिल्ह्यात शनिवारी लम्पी आजाराने 7 जनावरांचा मृत्यू झाला. दुसरीकडे बाधित जनावरांची संख्या 65 वर आहे. दिलासादायक बाब म्हणजे 22 जनावरे बरी झाली असून 36 जनावरांना अलगीकरणात ठेवण्यात आले होते. मृत जनावरांत 5 गायी आणि 2 बैलाचा समावेश आहे.


दरम्यान, जांभळी (ता. शिरोळ) येथील मोटखे-पाटील यांनी गोठ्यातील 40 गाईंना लम्पी स्किन आजार झाला असून त्यातील 4 दुभत्या गाई दगावल्याचा दावा केला आहे. जांभळी-नांदणी रोडवर 400 हून अधिक गायी असणाऱ्या गोठ्यात तब्बल 30 गायींना लम्पीची लागण झाली होती. काही दिवसांपासून या गायींवर खासगी पशुवैद्यकियांकडून उपचार सुरू आहेत. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून गायींच्या मृत्यूची मालिका सुरू असून, आतापर्यंत एकूण चार गायींचा लम्पी आजाराने मृत्यू झाला आहे. यातील दोन गायी गाभण होत्या. सध्या बाधित 9 गायी बऱ्या झाल्या आहेत. उर्वरित 19 गायींवर सध्या उपचार सुरू आहेत. उपचाराखालील असणाऱ्या अन्य गायींची प्रकृती चिंताजनक आहे.


यासंदर्भात पशुसंवर्धनचे जिल्हा उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण म्हणाले, तालुका पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी संबंधित गोठा मालकांना माहिती विचारली होती, पण त्यांनी ती दिली नाही. याबाबत माहिती घेण्यात येईल.


मृत जनावरांचे तातडीने अहवाल देण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत.  अहवाल आल्यानंतर पशुपालकांना भरपाई देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धनचे जिल्हा उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी सांगितले आहे.  दरम्यान, पशुसंवर्धन मंत्री व सचिवांनी जिल्ह्यातील बाधित जनावरांचा व्हीसीद्वारे आढावा घेतला. यावेळी शेतकर्‍यांच्या गोठ्यापर्यंत अधिकार्‍यांनी जावे, शासनाच्या वतीने औषधे, लस उपलब्ध असून त्याची तातडीने अंमलबजावणी करा, अशाही सूचना करण्यात आल्या.


जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणासह अन्य उपाययोजना सुरू असल्या तरी दररोज बाधित आणि मृत्यूचा वाढता आकडा प्रशासनाची चिंता वाढविणारा आहे. जिल्ह्यात लम्पी आजाराने हातकणंगले तालुक्याबरोबर आता शिरोळ तालुक्याला वेठीस धरले आहे. तालुक्यातील जांभळी गाव हॉटस्पॉट बनले असून, बाधित जनावरांची संख्या वाढत आहे.