lumpy skin disease : जनावरांमधील लम्पी चर्मरोगाने महाराष्ट्रात भयावह रुप धारण केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये 27 जनावरे या रोगाला बळी पडली आहेत. मोठ्या प्रमाणात पशुधनामध्ये आजार फैलावत चालल्याने पशुधन उत्पादक मुळापासून हादरला आहे. लसीकरणाने वेग घेतला असला, तरी साथ अजून आटोक्यात आलेली नाही.

  


सातारा जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाने कहर केला असून आतापर्यंत 15 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील 321 जनावरांना लागण झाली असून आजघडीला 242 अॅक्टीव्ह केसेस आहेत. सातारनंतर कोल्हापूरमधील परिस्थिती बिकट असून 9 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 108 जनवरांना लागण झाली असून 76 पशुधनावर उपचार सुरु आहेत. सांगलीमध्ये 105 जनावरे बाधित झाली असून तीन मृत्यू झाले आहेत. 


तीन जिल्ह्यातील प्रशासनाकडून सर्व गायींचे प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्थानिक प्रशासनाला नोंदणीकृत नसलेल्या भटक्या गायींचे लसीकरण करण्यास सांगितले आहे. 


राहुल रेखावार या निर्णयाबाबत माहिती देताना म्हणाले, आम्ही भटक्या गायींचे लसीकरण सुरु केलं आहे. शनिवारपर्यंत कोल्हापूर शहरातील भटक्या गायींचे लसीकरण करण्याचे नियोजन मनपाकडून करण्यात आले आहे. पशुधन मालकांनी स्वत: पुढे येत लसीकरण करून घेतले पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यात 2.8 लाख नोंदणीकृत गायी असून त्यापेक्षा डबल लसीचे डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे लागण होण्यापूर्वीच लसीकरण तत्काळ करून घेतले पाहिजे. 


कोल्हापूर जिल्ह्यात दीड लाख गायींचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. खासगी संस्थांकडूनही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक 8.3 लाख गायी आहेत.  राहुल रेखावार पुढे म्हणाले, गाय पशुधन मालकांनी सर्वाधिक काळजी घेणं आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांची वाहतूक होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. जनावरांचा गोठा  स्वच्छ असायला हवा.  


इतर महत्वाच्या बातम्या