कोल्हापूर : एकीकडे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) हे महाविकास आघाडीच्या (MVA) पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्याची चर्चा सुरु असताना, ही चर्चा फिसकटल्याचं दिसतंय. कारण  महाविकास आघाडी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangle Lok Sabha constituency) उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तसे सूतोवाच केले आहेत. राजू शेट्टी यांनी पाठिंबा घेतला नाही तर आम्हाला उमेदवार द्यावा लागेल, असं जयंत पाटील म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते.  


सांगलीत शिवसेनेने उमेदवार घोषित केला आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उतरवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र त्याला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. सांगलीची जागा काँग्रेसची असल्याची भावना वेळोवेळी काँग्रेस नेत्यांनी बोलून दाखवली आहे. मात्र यात आणखी काही मार्ग निघतो का याचे प्रयत्न सुरू आहेत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.  


राजू शेट्टी यांची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया 


दरम्यान, जयंत पाटील आणि मविआच्या भूमिकेनंतर राजू शेट्टी यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली. राजू शेट्टी यांची एकला चलोरीचीच भूमिका असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर पुन्हा कुणाशी बोलणं झालं नाही. जर भाजपचा पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीने उमेदवार उभा करू नये. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मी उभा राहणारच, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं. 


प्रकाश आंबडेकरांचा निर्णय दोन दिवसात


तिकडे वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासोबत बोलणे सुरू आहेत, दोन दिवसात अपेक्षित निर्णय होईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला.  तर माढ्याची जागा महादेव जानकरांना देण्याचे ठरलं होतं, मात्र ते महायुतीसोबत गेले, तिथे दुसरा उमेदवार शोधावा लागेल, असंही जयंत पाटील म्हणाले. 
 
यावेळी जयंत पाटील यांनी भाजपच्या 45 प्लस नाऱ्याची खिल्ली उडवली. एक जागा तर कोल्हापूर मध्येच कमी होईल दुसरी साताऱ्यात होईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला. कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज तर साताऱ्यात अजून उमेदवार ठरलेला नाही.


दरम्यान, उदयनराजे यांचा आमच्याशी कोणताही संपर्क नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. 


धनगर समाज भाजपवर नाराज आहे. धनगर समाज यावेळी शंभर टक्के त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे उत्तर देईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला. 


राजू शेट्टी दोनवेळा 'मातोश्री'वर


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. सध्या शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने हे या मतदारसंघातून खासदार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना या मतदारसंघात उमदेवार देण्यासाठी उत्सुक आहेत. पण इथे उमेदवार न देता आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यासाठी राजू शेट्टी यांनी दोन वेळा मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. 


उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार? 


उद्धव ठाकरे हे पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत असा दावा राजू शेट्टी यांनी त्यांच्या भेटीनंतर केला होता. उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिला तर हातकणंगले मतदारसंघात तिरंगी लढत निश्चित आहे. पण उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार याबाबत अद्याप उत्सुकता कायम आहे.  


VIDEO : जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?