Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर : आगामी काळात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी तर आगामी काळात लोकसभेसाठी काही मतदारसंघात उमेदवारांची घोषणाही केली आहे. तर काही ठिकाणी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे. अशातच कोल्हापुरात (Kolhapur) मात्र, लोकसभेची उमेदवारी मागणं शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या (Thackeray Group) जिल्हाप्रमुखाला महागात पडलं आहे. कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव (Murlidhar Jadhav) यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. 


काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. शेट्टी आणि ठाकरेंच्या भेटीनंतर मुलरीधर जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. नाराजी व्यक्त करत राजू शेट्टींना उमेदवारी देऊ नका, असं आवाहनही मुलरीधर जाधवांनी केलं होतं. त्यानंतर पक्षाकडून मुरलीधर जाधवांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांनंतर दोन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


राजू शेट्टींबाबत काय म्हणाले होते मुरलीधर जाधव? 


"मातोश्रीमधून राजू शेट्टी बाहेर पडल्यानंतर त्यांनी असं एक वाक्य वापरलं की, आदानी उद्योग समूहाचे जे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत, त्याच्या विरोधात जन आंदोलन मी उभं करणार आहे. त्यासाठी पाठिंबा मिळवण्यासाठी मी उद्धव साहेबांच्याकडे  गेलो. परंतु राजू शेट्टी हा माणूस असा आहे की दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. 2014 ला महायुतीच्या माध्यमातून याच राजू शेट्टींना सर्व शिवसैनिकांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून, स्वतःचं डिझेल घालून निवडून आणलं होतं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या, भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली आणि हेच राजू शेट्टी भाजपच्या गोटात जाऊन बसले. म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली.", असं मुरलीधर जाधव म्हणाले होते. 


"उद्धव साहेबांना माझी विनंती आहे की, पाच वर्षे शहर प्रमुख, तीन वर्ष तालुकाप्रमुख, 19 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करतोय. माझ्यासारख्या निष्ठावंतांची या ठिकाणी इच्छा आहे की हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मी लढवला पाहिजे. 2005 ला पक्ष फुटला त्यावेळीसुद्धा आम्ही पक्षासोबत राहिलो. गेल्या दीड दोन वर्षांपूर्वी सुद्धा आम्ही साहेब तुमच्यासोबत राहिलो. जयसिंगपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी महामोर्चे काढले.", असं जाधव म्हणाले होते. 


राजू शेट्टी आयत्या बिळात नागोबा : मुरलीधर जाधव 


"आज माझं ब्लडप्रेशर 195 झालं, साहेब मला दवाखान्यांमध्ये अॅडमिट केलं. अशा कार्यकर्त्याला जर संधी न मिळता राजू शेट्टींसारखा कुणीतरी आयत्या बिळात नागोबा होण्यासाठी येणार असेल तर जनता त्याचा नक्की विचार करेल. माझ्यासारख्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याला पण संधी द्यावी.", असं मुरलीधर जाधव म्हणाले.