Dhananjay Mahadik on Kolhapur Loksabha : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा कोण लढवणार? याबाबत अजूनही स्पष्टता नसतानाच आता भाजप राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.


पक्षाने लोकसभा लढवायला सांगितले तर लढवणार


खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, आजच्या घडीला कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे आहेत. ज्या पद्धतीने शिवसेनेने काल बैठक घेतली तशा आमच्या शेकडो बैठका झाल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरात  महायुती म्हणून जो उमेदवार दिला जाईल त्यांना निवडून आणले जाईल. वरिष्ठ पातळीवर जिल्ह्यातील एखादी जागा भाजपकडे आली तर जिंकून आणू. राज्यसभेचा खासदार असलो आणि पक्षाने लोकसभा लढवायला सांगितले तर लढवणार असल्याचे धनंजय महाडिक म्हणाले. त्याचबरोबर राज्यसभेचा खासदार नसतो आणि पक्षाने थांबायला सांगितलं असतं तरी थांबलो असतो, असेही त्यांनी नमूद केले. 


आमचा महायुतीतील अंतर्गत विषय आम्ही बघून घेऊ


आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी (2 डिसेंबर) बोलताना शिंदे गटातील 7 खासदार भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे म्हटले होते. तसेच राजू शेट्टी यांनाही सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार महाडिक यांनी सतेज पाटील यांना टोला लगावला. 


ते म्हणाले की, सतेज पाटील यांच्याकडे काही बंगालची माणस आहेत जे जादूटोणा किंवा भविष्य बघत असतात. आमचा महायुतीतील अंतर्गत विषय आहे आम्ही बघून घेऊ. काँग्रेसच्या नेत्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करणे गरजेचं नाही. सतेज पाटील पालकमंत्री असताना आम्हाला दहा टक्के नाही तर दहा रुपये देखील दिले नाहीत, त्यामुळे आता ते कोणत्या तोंडाने निधी मागत आहेत? असा सवाल त्यांनी केला. 


एमडींना मारहाण करणारे सतेज पाटलांचे गुंड 


धनंजय महाडिक यांनी राजाराम कारखान्याच्या एमडींना झालेल्या मारहाणीनंतर सतेज पाटील यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, कारखान्याच्या अधिकाऱ्यांना मारहाण ही सहकारातील काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या सहकाराच्या इतिहासात आजपर्यंत असं कधीही घडलेलं नाही. कारखान्याच्या एमडींना मारहाण करणारे सतेज पाटलांचे गुंड आहेत. सतेज पाटील यांनी आपल्या गुंड प्रवृत्तीचे दर्शन काल दाखवून दिले. ते मनोरुग्न आहेत, पराभव पचवू शकत नाहीत. 


इतर महत्वाच्या बातम्या