Kolhapur Ganesh Immersion : तब्बल 28 तास डाॅल्बीचा अखंड दणदणाट आणि झगमगणारी लेझर लाईट यामध्ये कोल्हापूरमधील गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली. ही मिरवणूक पाहण्यासाठी अलोट जनसागर लोटला होता. कोरोना महामारीमुळे सलग दोन वर्ष आनंदाला मुकलेल्या गणेश मंडळांनी यावेळी चांगलाच कहर केला. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये उन्मादही दिसून आला.

  


आता गणेशोत्सवानंतर कोल्हापूर जिल्ह्यात दृष्टीदोष जाणवणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. विशेषतः विसर्जन मिरवणुकीनंतर डोळ्यांमध्ये जळजळ होणे, कमी दिसणे असे 60 हून अधिक अधिकृत रुग्ण समोर आले आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची भीती कोल्हापुरातील नेत्ररोग तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 


डोळ्यात जळजळणे, भाजल्यासारखे वाटणे यासारखे परिणाम 


याबाबत  नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अभिजित तगारे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, गेल्या 10 दिवसांच्या गणपती उत्सवामध्ये तसेच आगमन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात डाॅल्बी आणि लेझर शोचा वापर केला गेला. या मिरवणुकीमध्ये नाचगाणे केलेल्यांच्या अनेकांच्या डोळ्यावर लेझर किरणांचा परिणाम होऊन दुष्परिणाम झाले आहेत. 


काही लोकांमध्ये डोळ्यात जळजळणे, भाजल्यासारखे वाटणे यासारखे परिणाम दिसून आले आहेत. मात्र, काही लोकांच्या डोळ्यांच्या बरोबर मध्यभागी किरण पडल्याने भयंकर मोठा दुष्परिणाम भोगावा लागला आहे. कोल्हापूरमध्ये आता 60 ते 65 रुग्ण आढळून आल्याचे तगारे यांनी सांगितले. मात्र, हा आकडा डाॅक्टरांकडे आलेला असून अजूनही त्रास होत असतानाही डाॅक्टरकडे गेलेले नाहीत, अशाचा आकडा मोठा असू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. 


उपचार करूनही धोका कायम राहण्याची शक्यता


डोळ्यांमध्ये रक्तस्त्राव झाल्यानंतर नजर बंड पडल्याने या रुग्णांना उपचाराची आवश्यकता आहे. त्यामुळे विविध उपचार करून घेण्यासाठी जवळपास 5 हजार ते 50 हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. परत उपचार करून त्रास होण्याची शक्यता ही राहतेच. त्यामुळे याचे भविष्यात आणखी काय परिणाम होणार आहेत, हे सांगता येत नसल्याचेही ते म्हणाले. 


या दणक्याने विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर शो समोर केलेला नाच अनेकांच्या अंगाशी आला आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर शहरात जशी विसर्जन मिरवणूक रंगली तशीच आगमन मिरवणूकही रंगली होती. या दोन्ही अनेक मंडळांनी डाॅल्बी आणि लेझर शोचा यथेच्छ वापर केला होता. या लेझर शो आणि अत्याधुनिक लाईट इफेक्टमुळे रुग्ण संख्येत वाढ झाल्याने मिरवणुकीत सहभागी झालेल्या आणि आणि इफेक्टशी जवळून संपर्क आलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.