Kolhapur KMT : कोल्हापूर शहर हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांना देण्यात येणाऱ्या बसेसेवेला हद्दवाढ कृती समितीने आज कडाडून विरोध करत सेवाच बंद पाडली. त्यामुळे कोल्हापूर शहरासह नजीकच्या गावांमध्ये पहाटेपासून सुरु होणारी बससेवा पूर्णत: कोलमडली. सर्वपक्षीय हद्दवाढ कृती व समन्वय समितीने पहाटे पाचपासूनच बुद्ध गार्डन येथील केएमटी वर्कशॉपसमोर ठिय्या मांडल्याने एकही केएमटी बाहेर पडली नाही.
बारा वाजेपर्यंत एकही बस बाहेर न पडल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सोसावा लागला. त्यामुळे शहर बससेवा पहाटेपासून दुपारी साडे बारापर्यंत विस्कळीत झाली. दुपारी साडे बाराच्या सुमारास आंदोलन समितीकडून तात्पुरते स्थगित करण्यात आले. महापालिका अधिकारी व कृती समितीचे पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये मुडशिंगी व येवती हे दोन मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामीण भागातील बसेसचा पुढील 10 दिवसांत निर्णय होणार
पहिल्या टप्प्यात दोन मार्गांवरील बससेवा बंद झाली असली, तरी ज्या मार्गांवर बस तोट्यामध्ये धावत आहे त्या मार्गांवरील निर्णय येत्या 10 दिवसांमध्ये घेण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाकडून याबाबत आश्वासन देण्यात आल्यानंतर हद्दवाढ कृती समितीकडून आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, 22 सप्टेंबर रोजी कृती समिती पदाधिकारी व महापालिका प्रशासन यांच्यामध्ये बैठक होणार आहे.
कोल्हापूर शहर हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांमध्ये केएमटी बस सेवा देऊ नये, ग्रामीण भागातील तोट्यातील मार्ग बंद करावे यासाठी कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
कोल्हापूर शहरात हद्दवाढीवरून दोन गट लोकप्रतिनीधींकडून सोयीस्कर दुर्लक्ष
कोणत्याही परिस्थितीत महापालिकेची परिस्थिती बदलण्यासाठी हद्दवाढ क्रमप्राप्त असल्याने शहरातील लोकप्रतिनिधींकडून ठाम भूमिका अपेक्षित त्यांच्याकडून झालेले सोयीस्कर दुर्लक्षाने ताप वाढत चालला आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून दोन गट पडल्याने दोन्ही गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे कोल्हापूर शहर विरुद्ध हद्दवाढीतील गावे असा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे शहराची स्थिती सुधारण्यासाठी लोकप्रतिनीधींनी एकत्र येऊन गावांना विश्वास देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हा प्रश्न अधिकच चिघळत राहणार आहे यात शंका नाही.
इतर महत्वाच्या बातम्या