कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन महिन्यात तीनदा पक्ष बदलून ठाकरे गटामध्ये गेलेल्या माजी आमदार के पी पाटील यांनी आता पुन्हा एकदा कोलांटउडी मारण्याचा निर्णय घेतला आहे का? अशी चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. ठाकरे गटाचे नेते के पी पाटील यांनी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची थेट त्यांच्या कागलमधील निवासस्थानी जाऊन भेट घेत फेटा बांधून त्यांचा सत्कार केला. त्यामुळे पुन्हा एकदा के पी पाटील यांच्या कोलांटउडी मारण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी के पी पाटील यांनी घरी जात सत्कार केला. त्यामुळे पाटील हे पुन्हा एकदा महायुतीमध्ये येणार असल्याची चर्चा रंगली आहे. 


प्रकाश आबिटकर आणि के पी पाटील कट्टर राजकीय वैरी


के पी पाटील यांनी ठाकरे गटाकडून राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा प्रकाश आबिटकर यांनी 38 हजारांवर मताधिक्यांनी दारुण पराभव केला. त्यामुळे के पी पाटील पुन्हा एकदा महायुतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशी सुद्धा चर्चा आहे. राधानगरीच्या स्थानिक राजकारणामध्ये प्रकाश आबिटकर आणि के पी पाटील हे कट्टर राजकीय वैरी आहेत. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आबिटकर यांच्याकडून पॅनल उभा करण्यात आलं होतं. मात्र या निवडणुकीमध्ये आबिटकर यांना के पी पाटील यांचा पराभव करण्यात अपयश आलं होतं. कारखान्याच्या सर्वच्या सर्व जागा के पी पाटील यांच्या आघाडीने जिंकल्या होत्या. केपींच्या आघाडीमध्ये हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी मदत केली होती. आता मात्र परिस्थिती बदलली असून आपण आबिटकर कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यामुळे बदलते राजकीय संदर्भ लक्षात घेता हसन मुश्रीफ यांच्याजवळ के पी पाटील जाण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या