Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा परिषदेच्या 76 आणि 152 पंचायत समित्यांच्या मतदारसंघाची प्रारुप रचना जाहीर करण्यात आली आहे. नव्या प्रारुप रचनेनुसार झेडपीचे 9, तर पंचायत समित्यांच्या 18 मतदारसंघांची वाढ झाली आहे. नव्या प्रारुप रचनेत काही गावांची अवस्था अर्धे इकडे आणि उर्वरित तिकडे अशी झाली आहे. त्यामुळे उमेदवारांची प्रचार कतरताना चांगलीच दमछाक होणार आहे. नव्या प्रारुप रचनेत करवीर तालुक्यामध्ये 2 मतदारसंघ वाढले आहेत.  गगनबावडा, भुदरगड, आजरा आणि गडहिंग्लज या तालुक्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. बाकी 7 तालुक्यांमध्ये झेडपीचा एक गट वाढला आहे, तर पंचायत समित्यांमध्ये 18 मतदारसंघांची वाढ झाली आहे.  

  


या ठिकाणी पाहता येईल प्रारुप रचना


नव्याने जाहीर झालेली प्रारुप रचना जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय तसेच ग्रामपंचायत आदी ठिकाणी पाहता येणार आहे. 2 ते 8 जून या कालावधीत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. 21 जूनपर्यंत आलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन त्या पूर्ण केल्या जातील. याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांना 22 जुनला सादर करण्यात आला आहे . ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर 27 जुनला अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल. 


प्रभाग रचना सापडली वादाच्या भोवऱ्यात 


जिल्हा परिषदेच्या 76 आणि पंचायत समितीच्या 152 गणांची प्रभाग रचना काल जाहीर झाल्याने वादाला तोंड फुटले आहे. प्रभाग रचना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. भौगोलिक संलग्नता टाळून राजकीय दबावाखाली चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना केल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केला आहे.


फेब्रुवारी महिन्यात प्रभाग रचनेचा आराखडा व्हायरल झाला होता. त्याचवेळी भारतीयांनी गोपनीयतेचा भंग झाल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली होती. मात्र तक्रारीनंतरही प्रभाग आराखडा कायम ठेवल्याने आता नरके यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असून प्रसंगी न्यायालयात धाव घेणार असल्याचे देखील नरके यांनी म्हटले आहे. 


दरम्यान, जिल्ह्यातील राजकारण पैशाच्या जोरावर चुकीच्या पद्धतीने रेटलं जात असल्याचा आरोपही नरके यांनी नाव न घेता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या